धाराशिव – शहरातील समता नगर भागातील विसर्जन विहीर ते सुधीर अण्णा पाटील (डीआयसी रोडपर्यंत) या रस्त्याचे रखडलेले हॉट मिक्सचे काम सुरू करण्यासाठी समता गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नाना घाटगे यांनी आज बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाच्या दबावामुळे नगर परिषदेने २४ तासांत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
नगरी दलितेतर वस्ती सुधार योजना २०२२-२३ अंतर्गत या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली होती. मात्र, ठेकेदाराने तीन महिन्यांपासून कामाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मणक्याचे आणि धुळीमुळे श्वसनाचे आजार जडत होते. नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने घाटगे यांनी उपोषणाला सुरुवात केली.
उपोषणाला समता नगरमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला. त्यामुळे नगर परिषद प्रशासन भेदरले आणि त्यांनी ठेकेदाराला उपोषण स्थळी बोलावून घेतले. नगर परिषद आणि ठेकेदाराने २४ तासांत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित करण्यात आले. काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समता नगरवासियांनी दिला आहे.