धाराशिव – शहरातील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांची उकल होताच, राजकीय नाटकाचा आणखी एक ‘एपिसोड’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खुला झाला. समता नगर भागातील विसर्जन विहीर ते सुधीर अण्णा पाटील (डीआयसी रोडपर्यंत) रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे, या मागणीसाठी नाना घाटगे यांनी बेमुदत उपोषणाचे शस्त्र उपसले, पण या ‘दबाव’ आंदोलनात पब्लिसिटीचा तडका जास्त असल्याची चर्चा रंगली आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाचे जणू महायज्ञच रंगले! उपोषण करणारे नाना घाटगे, उपोषण मिटवणारे मावळते नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर आणि रस्ता कामाचे कंत्राट घेणारे सब-कॉन्ट्रॅक्टर शाहिद शेख आणि पंकज उर्फ बाबू पडवळ – सर्वच शिवसेनेचे कार्यकर्ते!विशेष म्हणजे कामाचे उद्घाटन देखील हेच करणार आणि उपोषण देखील हेच करणार !
या राजकीय गटाच्या ‘सर्वस्पर्शी’ कामगिरीचे कौतुक शहरभर होत आहे. पण खरी धमाल झाली ती म्हणजे घाटगे यांचे मित्र पंकज उर्फ बाबू पडवळ उपोषणाच्या फोटोतून अदृश्य होणे! मित्र म्हणून उपोषणात सहभागी होण्याचा ‘त्याग’ दाखवणारे बाबू, फोटोसाठी मात्र उशीरा हजर? “हे उपोषण आहे की अभिनयाचा प्रयोग?” अशी उपहासपूर्ण कुजबुज नागरिकांत ऐकू आली.
आणखी एक ‘गोड योगायोग’ म्हणजे या रखडलेल्या कामाचा अंदाजे खर्च ५०-६० लाख रुपये आहे, ज्यात सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्या भूमिकांची वाटणी करून घेतली आहे. त्यामुळे “उपोषणात रस्ता मिळाला नाही, पण पब्लिसिटीचा महामार्ग मिळाला,” असा टोला विरोधकांनी लगावला आहे.
धाराशिवकरांना प्रश्न:
लवकरच धाराशिव नगर परिषदेची निवडणूक रंगणार आहे. पण तत्पूर्वीच नगरसेवक होण्याच्या स्वप्नांसाठी हे नाटक चालूच राहणार का? शिवसेनेचा हा ‘संपूर्ण पॅकेज डील’ पाहून नागरिक म्हणतात, “रस्ते पक्के होतील की राजकारण्यांचे कनेक्शन?”