धाराशिव शहराच्या आयुर्वेदिक कॉलेज ते तेरणा कॉलेज मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची कृपा सार्वजनिक बांधकाम विभागाने केली खरी, पण हा फार्स ठरल्याशिवाय राहिला नाही. गोरगरीबांचे गाठोडे रस्त्यावर फेकले गेले, मात्र श्रीमंतांचे बंगल्यातील दिवे मालवले नाहीत!
नगर पालिकेचा नकारात्मक ठोका
धाराशिवमध्ये अतिक्रमण हे नवीन नाही, पण नगर पालिका याकडे झोपेचे सोंग घेत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण फोफावले आहे—हॉटेल्स, पान टपऱ्या, दुकानांची रेलचेल! वाहतुकीची कोंडी इतकी भयानक झाली आहे की, रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.
पैसे घेऊन परत मिळणारे पत्रे?
सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवलेल्या पानटपऱ्या आणि पत्र्यांचा अजब प्रकार समोर आला आहे. नगरपालिकेच्या नाट्यगृहाच्या मागे त्यांची रास टाकण्यात आली आहे. पण पुढे काय होणार, हे शहरातील प्रत्येकाला माहित आहे—‘जो पैसा देतो, त्याला परत मिळतो’ हा खेळ सुरूच आहे!
मुख्याधिकारींची ‘दूरस्थ’ प्रशासनशैली!
धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मॅडम धाराशिवमध्ये राहतच नाहीत! त्या ९० किलोमीटर दूर असलेल्या लातूरमध्ये स्थायिक आहेत आणि रोज ‘ये-जा’ करतात. काहीवेळा त्या उपस्थितच नसतात, मग कंत्राटदारांना सह्या घ्यायला लातूरला जावे लागते—आणि ‘पॉकेट’ही तिथेच दिले जाते!
निधी अतिक्रमण हटवण्यासाठी, पण गायब कुठे?
दरवर्षी अतिक्रमण हटवण्यासाठी निधी मंजूर होतो. पण तो खरोखर वापरण्यात येतो का? कागदोपत्री मोहिमा दाखवून निधी हडप करण्याचा ‘खास प्लॅन’ दरवर्षी आखला जातो!
माजी भ्रष्ट्राचार्यांनाही मागे टाकले?
माजी निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्याही भ्रष्टाचाराच्या कहाण्या चर्चेत होत्या. पण सध्याच्या मुख्याधिकारी मॅडम यांनी त्या रेकॉर्डलाही मागे टाकले आहे, असा आरोप शहरात चर्चेत आहे. नगरपालिकेचे कंत्राटदारांशी असलेले ‘गुप्त व्यवहार’ आणि ‘पार्टनरशिप’ अधिकच गडद होत चालली आहे!
शहराची ‘वाढती बकालपणा’ची वाटचाल!
धाराशिवच्या नगरपालिकेच्या अनागोंदीमुळे शहराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. अतिक्रमण हटाव मोहिम फक्त कागदावरच, कंत्राटदारांचे खिसे भरायला निधी मंजूर, मुख्याधिकारी शहराबाहेर, आणि रस्त्यांवर जनतेचा गोंधळ—हा नवा शहरी ‘डाव’ सुरुच आहे!
शहराचा आवाज उठेल, तेव्हाच काहीतरी बदलेल… नाहीतर ‘बकाल’ हा ट्रेंड असाच चालू राहील!