धाराशिव : शहरात बेकायदेशीरपणे चंदनाच्या लाकडाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना मुद्देमालासह पकडण्यात धाराशिव शहर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बालाजी नगर परिसरात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी विठ्ठल सुरवसे (वय ६०, रा. बालाजी नगर, धाराशिव) यांच्या घरासमोरच हा प्रकार घडला. शहाजी लिंगाप्पा माळी (रा. नारी, ता. बार्शी, जि. सोलापूर) आणि तात्यासाहेब अर्जुन खंडागळे (वय ३५) हे इतर दोन साथीदार जंगलातून चोरून आणलेल्या चंदनाची विक्री करण्याच्या तयारीत होते. ते मोटरसायकल (क्रमांक एमएच १३ डी व्ही ०६२३) वरून या चंदनाची वाहतूक करत असताना पोलिसांना आढळून आले.
याप्रकरणी पोलीस हवालदार रंजना नागनाथ टोम्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), वृक्षतोड अधिनियम कलम ३ आणि भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ४१ व ४२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.