धाराशिव: शाळेची घंटा वाजणार, नवीन वर्ग, नवीन पुस्तकं पण… गणवेशाचं काय? जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या चिमुकल्यांना यावर्षीही शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन गणवेश मिळण्याची शक्यता ‘अत्यंत धूसर’ झाली आहे. शासनाकडून निधी वितरणाला झालेला उशीर आणि तोही केवळ एका गणवेशासाठी; यामुळे ऐनवेळी गणवेश शिवून कसे मिळणार, हा मोठा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. त्यामुळे, “शाळा सुरु झाली, गणवेशाचं काय झालं?” असा सवाल विचारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येण्याची दाट चिन्हे आहेत.
गतवर्षीचा ‘महाघोटाळा’ अन् यंदाही दिरंगाईचा पाढा!
गेल्या वर्षी गणवेश वितरणात जो काही ‘महा-घोळ’ झाला, तो न विसरण्यासारखा! महिला आर्थिक विकास महामंडळ आणि बचत गटांच्या माध्यमातून गणवेश शिवण्याचे निर्देश होते, पण हे प्रकरण इतकं रेंगाळलं की शाळेचं सत्र संपत आलं तरी गणवेशाचं ‘पुराण’ काही संपलं नाही. तब्बल १० हजारांहून अधिक विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले. ज्यांना मिळाले, त्यांनाही ‘एक बाही आखूड, दुसरी लांब’, ‘गुंड्या खाली-वर’, ‘कपड्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट’ अशा अनेक तक्रारींनी ग्रासलं होतं. तब्बल २२ हजार गणवेशांबाबत अशा तक्रारी आल्या होत्या. हा अनुभव पाठीशी असतानाही, यावर्षी पुन्हा निधी वितरणालाच विलंब झाल्याने पालकांच्या आणि शिक्षकांच्या कपाळावर आठ्या पसरल्या आहेत.
यावर्षी लाभार्थी घटले, पण समस्या कायम!
विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गणवेशाच्या लाभार्थ्यांची संख्या सुमारे ६ हजारांनी कमी होऊन ९६ हजार ३६३ झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश मिळण्याची तरतूद आहे. पण सध्या तरी एकाच गणवेशाची रक्कम वर्ग झाली असून, ती शाळांपर्यंत पोहोचायला किती दिवस लागतील, हे सांगणे कठीण. सोबतच, प्रत्येक विद्यार्थ्याला बूट आणि दोन पायमोज्यांसाठी १७० रुपये अनुदानही दिले जाणार आहे, पण तेही गणवेशाच्या निधीसोबतच ‘अडकले’ आहे.
पुन्हा ‘जुनीच पद्धत’, पण वेग मात्र ‘कासवछाप’!
गतवर्षीच्या गोंधळातून धडा घेत, शासनाने पुन्हा शालेय व्यवस्थापन समितीकडे गणवेशाचे अधिकार सोपवले आहेत. समिती स्थानिक पातळीवर गणवेश शिवून घेणार किंवा खरेदी करणार. ही पद्धत २०२३ पूर्वी वापरली जात होती. पण, निधीच वेळेवर पोहोचला नाही, तर समिती तरी काय करणार? “लवकरच प्रक्रिया पूर्ण होईल आणि दर्जेदार गणवेश मिळतील,” असा विश्वास प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी व्यक्त केला असला तरी, ‘लवकरच’ची व्याख्या काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
एकंदरीत काय, तर शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेशाऐवजी जुन्याच कपड्यांवर किंवा प्रश्नचिन्ह घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका पुन्हा एकदा या चिमुकल्यांना बसणार नाही, एवढीच अपेक्षा!