धाराशिव : महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. धाराशिव तालुक्यातील खेड येथील एका किराणा दुकानावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे ९,३९५ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड येथील रहिवासी सतिश लिंबराज गरड (वय ५५) हे आपल्या किराणा दुकानातून शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री करत होते. याबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी, ३१ जुलै रोजी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास गरड यांच्या दुकानावर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान, दुकानात विक्रीसाठी ठेवलेला विविध कंपन्यांचा गुटखा, विमल पानमसाला, राजनिवास पानमसाला, जाफरानी जर्दा, सुगंधित तंबाखू असा एकूण ९,३९५ रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा सर्व साठा तात्काळ जप्त केला.
याप्रकरणी दुकानदार सतिश गरड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.