धाराशिव: शहरात दिवसाढवळ्या चोरीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेले कर्मचारी जे. डी. कावळे यांनी बँकेतून काढलेली १ लाख ६० हजार रुपयांची रक्कम, चोरट्याने त्यांच्या स्कुटीची डिकी उघडून लंपास केली. विशेष म्हणजे, हा चोरटा बँकेपासूनच त्यांच्यावर पाळत ठेवून होता आणि चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जे. डी. कावळे हे शुक्रवारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या आनंदनगर शाखेत गेले होते. त्यांना रुग्णालयाच्या कामासाठी पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी बँकेतून १ लाख ६० हजार रुपये काढले. खबरदारी म्हणून त्यांनी ही रक्कम आपल्या स्कुटीच्या डिकीमध्ये ठेवली.
बँकेतील काम आटोपून ते गालिबनगर येथील डी. के. इलेक्ट्रिक या दुकानाजवळ काही कामासाठी थांबले असता, अज्ञात चोरट्याने संधी साधली. त्याने कावळे यांची नजर चुकवून स्कुटीची डिकी उघडली आणि आत ठेवलेली १ लाख ६० हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. काही वेळातच आपली रक्कम चोरीला गेल्याचे श्री. कावळे यांच्या लक्षात आले.
प्राथमिक तपासात आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, हा चोरटा बँकेपासूनच श्री. कावळे यांच्या मागावर असल्याचे दिसून आले आहे. त्याने योग्य संधी साधून हातचलाखीने ही चोरी केली.
या घटनेमुळे बँक परिसरातून मोठी रक्कम काढणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बँकेतून बाहेर पडताना नागरिकांनी अधिक सतर्क राहावे आणि मोठ्या रकमा अशा प्रकारे उघड्यावर किंवा सहज उघडता येतील अशा ठिकाणी ठेवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.
Video