धाराशिव – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती आहे, तर काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षांनी महाविकास आघाडी स्थापन केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळाचा नारा दिला आहे. धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या उमेदवारांची माहिती दिली आहे.
धाराशिव मतदारसंघात ऍड. प्रणित डिकले (मराठा), तुळजापूर मतदारसंघात डॉ. स्नेहा सोनकाटे (धनगर) आणि परंडा मतदारसंघात प्रवीण रणबागुल (बौद्ध) या उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे हे उमेदवार राज्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.