धाराशिव: केवळ महिनाभरापूर्वी थाटामाटात उद्घाटन झालेल्या धाराशिव आणि तुळजापूर येथील एस.टी. बसस्थानकांच्या निकृष्ट बांधकामाचे पितळ उघडे पडले आहे. धाराशिव बसस्थानक अंधारात आहे, तर तुळजापूर स्थानकाला पहिल्याच पावसात गळती लागली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कडक कारवाई करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्रवासी आणि प्रसारमाध्यमांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव येथे पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा असा अपव्यय सहन केला जाणार नाही. या दोन्ही बसस्थानकांच्या बांधकामाची तातडीने चौकशी करून, या निकृष्ट कामाला जबाबदार असणाऱ्या प्रवृत्तींना कठोर शिक्षा केली जाईल.”
विशेष म्हणजे, १ मे रोजी स्वतः पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते या बसस्थानकांचे उद्घाटन झाले होते. मात्र, काम अपूर्ण असतानाही उद्घाटनासाठी घाई कोणी केली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मंत्र्यांनी सांगितले की, “माझी दिशाभूल करून अपूर्ण कामांचे उद्घाटन करण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”
कोट्यवधी पाण्यात, तरीही गैरसोय कायम
तुळजापूर येथील बसस्थानकासाठी ८ कोटी रुपये खर्च करण्यात आले, परंतु पहिल्याच पावसात छताला गळती लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दुसरीकडे, ११ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या धाराशिव येथील मध्यवर्ती बसस्थानकात अद्याप विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण स्थानक अंधारात बुडालेले असते, परिणामी चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जनतेच्या पैशातून उभारलेल्या या सुविधांची महिन्याभरातच झालेली दुर्दशा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. आता मंत्री सरनाईक यांच्या चौकशीच्या आदेशानंतर तरी दोषींवर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.