धाराशिव: ठाकरे सरकारने राज्याच्या हिश्शयाचा वाटा न दिल्यामुळे रखडलेल्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाला आता गती आली आहे. धाराशिव-तुळजापूर या पहिल्या टप्प्यातील ३० किलोमीटर कामापैकी साधारणपणे आठ किलोमीटर अंतराचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. जवळपास २५ टक्के काम पूर्णत्वाकडे आले असून या मार्गावर एकूण लहान-मोठे ५० पूल असणार आहेत.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तीन टप्प्यात काम सुरू आहे – खोदकाम, भराव आणि पुलांचे काम. धाराशिव ते तुळजापूर या ३० किलोमीटर अंतरावर १७ मोठे आणि ३३ छोटे पूल असतील. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर १०६ मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल उभारण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील ३० किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी ५४४ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. ठाकरे सरकारने राज्याच्या वाट्याचा हिस्सा नाकारल्यामुळे रखडलेल्या कामांना महायुती सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर कामाला गती आली आहे.
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या ८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. या रेल्वेमार्गावर एकूण ११० पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत.
धाराशिव-तुळजापूर या ३० किलोमीटर रेल्वेमार्गावर तीन नवीन रेल्वेस्थानके उभारली जाणार आहेत – सांजा, वडगाव आणि तुळजापूर. धाराशिव येथील मुख्य रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी नुकतेच केंद्र सरकारने २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
युद्धपातळीवर काम सुरू असून, पुढील आठवड्यापासून या मार्गावरील पुलांच्या कामांना सुरुवात होणार आहे. ठरविलेल्या उद्दिष्टाप्रमाणे दोन वर्षांच्या आत रेल्वेमार्ग तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचेल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.