धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे मार्गाच्या मागणीला आता चार दशके होत आली, तरीही कामाला अद्याप ठोस गती आलेली नाही. स्थानिक लोकांच्या विकासाच्या अपेक्षा या रेल्वे मार्गावर केंद्रित आहेत. रेल्वेने जोडले जाणे म्हणजे आर्थिक विकास, रोजगाराच्या संधी, आणि वाहतुकीची सुधारणा, असे सर्वच लोकांचे स्वप्न आहे. पण या स्वप्नांच्या पलीकडे पाहिले तर खेदजनक वास्तव दिसते: हा प्रकल्प केवळ राजकीय आखाड्याचा खेळ झाला आहे, जिथे आश्वासनांचा फक्त बाजार लागतो, प्रत्यक्ष कृती मात्र शून्य आहे.
२०१४ साली जाहीर झालेल्या या रेल्वे प्रकल्पाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. संसदेत या प्रकल्पावर झालेल्या चर्चेत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कामाच्या विलंबाबद्दल विचारणा केली. यावर उत्तरादाखल भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी उपळा शिवारात वाहने आणि यंत्राचे पूजन करून कामाला प्रारंभ झाल्याचे जाहीर केले. पण हा केवळ प्रचाराचा खेळ होता, असे लोकांना समजले आहे. या पूजन सोहळ्यात एकही रेल्वे अधिकारी नव्हता, ना कोणता शासकीय मंत्री उपस्थित होता. इतकंच काय, जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत देखील तिथे नव्हते. म्हणजेच, हा एक शासकीय कार्यक्रम नव्हता, तर फक्त एक राजकीय नाटक होता, जिथे लोकांच्या अपेक्षांवर अजून एकदा पाणी फिरवले गेले.
घोषणांची गुंतागुंत आणि वास्तव
राणा पाटील यांनी तीन टप्प्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. मात्र हे उद्दिष्ट कितपत व्यवहार्य आहे, यावर प्रश्न उपस्थित होतो. वास्तविकता अशी आहे की, २०१९ सालीच या कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याचा हिस्सा न दिल्याने प्रकल्प रखडला, असे सत्ताधारी भाजपकडून सांगितले जाते. परंतु, महायुती सरकार सत्तेवर येताच निधी उपलब्ध करून देण्यात आला, असा दावा केला जात आहे. हे सर्व आरोप-प्रत्यारोप राजकीय आहेत आणि जनतेला या वादात जास्त रस नाही. लोकांना फक्त विकास हवा आहे, जो वर्षानुवर्षे केवळ घोषणांमध्ये अडकला आहे.
उदघाटने आणि निवडणुकीचा जुमला
विधानसभा निवडणुका जवळ येत असताना भाजप आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे कामाच्या पूजनासारखे कार्यक्रम फक्त जनतेला भुलवण्यासाठीच केले जात आहेत का, हा प्रश्न उपस्थित होतो. यापूर्वीही अशा कित्येक उद्घाटनांनी लोकांची फसवणूक केली आहे. नवीन कामाची सुरुवात झाल्याचे जाहीर केले जाते, परंतु प्रत्यक्षात मात्र प्रकल्प कोठेच जात नाही. लोकांच्या आशा आणि अपेक्षांशी खेळण्याचे हे राजकारण अस्वीकार्य आहे.
याचा अर्थ असा होत नाही की रेल्वे प्रकल्प महत्वाचा नाही; उलटपक्षी, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, जनतेने आता या घोषणांवर विश्वास ठेवणे बंद करावे. राजकीय फायद्यासाठी केलेल्या उद्घाटनांची लांबलचक यादी लोकांना विसरता कामा नये. निवडणुका जवळ आल्या की या असत्य घोषणा आणि फसवे कार्यक्रम कसे अचानक सुरु होतात, याची पुरेशी जाणीव लोकांना झाली पाहिजे.
शेतकऱ्यांचे मुद्दे आणि असंतोष
या प्रकल्पाच्या संदर्भात आणखी एक गंभीर मुद्दा आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांचे भूसंपादन. ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांनी यावर तीव्र टीका केली आहे. शेतकऱ्यांचे पैसे न दिल्याशिवाय आणि त्यांची पूर्ण संमती न घेताच काम सुरु करण्याची घाई ही सत्ताधाऱ्यांची गंभीर चूक आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने घेणे किंवा त्यांना योग्य मोबदला न देणे, हे शेतकऱ्यांच्या हक्कांवर आघात आहे. हा प्रकल्प फक्त जनतेच्या हक्कांवर बळजबरी करून होत असेल, तर तो कुठल्याही प्रकारे समर्थनीय नाही.
खरे नेतृत्व कोणाचे?
सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये रेल्वे प्रकल्पाच्या श्रेयाची लढाई सुरु आहे. सत्ताधारी आपले काम पुढे नेण्याचा दावा करतात, तर विरोधक त्यांच्यावर वेळकाढूपणा आणि दिशाभूल करण्याचा आरोप करतात. याचं उत्तर एका साध्या प्रश्नात आहे: जनतेच्या समस्यांचे समाधान कोण करत आहे? फक्त उदघाटने आणि घोषणांमध्ये अडकलेल्या लोकांना विकास हवा आहे, जो त्यांना अजूनही मिळालेला नाही.
शेवटी… जनतेचा निर्णय
या सगळ्या राजकीय गदारोळात एक गोष्ट स्पष्ट आहे: लोकांना आता खोट्या घोषणा आणि फसवणूक सहन होत नाही. या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पात, आणि त्यासारख्या अन्य विकासाच्या योजनांमध्ये, आता केवळ भाषणबाजी नको, तर खऱ्या कृतीची गरज आहे. जनतेला फक्त कामाची गरज आहे, जे त्यांचे जीवन बदलू शकेल.
आता वेळ आली आहे की लोकांनी अशा फसव्या खेळांना ओळखून मतदानाच्या वेळी योग्य निर्णय घ्यावा. उदघाटनांचे नाटक बाजूला ठेवून, विकासाच्या सत्य मार्गावर चालणाऱ्या नेत्यांना निवडण्याची हीच योग्य वेळ आहे.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह