“महाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाड्यात धाराशिव जिल्हा.” ही ओळखच मुळात अनेक व्यथा आणि संघर्षांनी भरलेली. त्यात नीती आयोगाची देशातील तिसऱ्या क्रमांकाचा मागास जिल्हा म्हणून मिळालेली “पोचपावती” म्हणजे या भागाच्या नशिबी असलेल्या उपेक्षेवर मारलेला शिक्काच. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पाचवीला पुजलेल्या या धाराशिववर यंदा निसर्गाने असा काही अजब ‘प्रकोप’ केला आहे की, मे महिन्यातल्या रखरखत्या उन्हाच्या आठवणीही विरून गेल्या आणि डोळ्यांसमोर उभा राहिला तो केवळ विद्ध्वंस!
एरवी चाळिशी पार केलेल्या पाऱ्याची आणि अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्याची सवय असलेल्या धाराशिवकरांना यंदा निसर्गाच्या अवकृपेला सामोरे जावे लागले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या २२ मि.मी. पावसाच्या अंदाजाला धुळीस मिळवत, जिल्ह्यात तब्बल २७२ मि.मी. पाऊस कोसळला – अंदाजाच्या जवळपास बारा पट अधिक! काही ठिकाणी तर अपेक्षित पावसाच्या सातपट अधिक पावसाची नोंद झाली. हा आकड्यांचा खेळ वाटत असला तरी, यामागे दडलेली शेतकऱ्यांची आर्त किंकाळी काळजाचं पाणी पाणी करणारी आहे. गेल्या पंचवीस वर्षांतील उच्चांकी पावसाने शेतशिवारं पाण्याखाली गेली, ओढे-नाले दुथडी भरून वाहिले आणि उभी पिकं मातीमोल झाली. ‘अतिवृष्टी’ हा शब्द बातम्यांमध्ये वाचायला ठीक वाटतो, पण जेव्हा तो शेतकऱ्याच्या शेतावर आणि त्याच्या स्वप्नांवर बरसतो, तेव्हा त्याचा अर्थ किती भीषण असतो, हे कळंब तालुक्यातील इकुरका गावातील वामनराव शिंदे यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.
वामनराव शिंदेंनी २ लाख ७० हजार रुपये खर्चून लावलेली टरबुजाची शेती, ज्यातून साडेपाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते, ती अवघ्या काही तासांच्या पावसाने गुडघाभर पाण्यात गेली आणि बघता बघता सडून गेली. हे फक्त टरबुजाचे सडणे नव्हते, तर त्यामागे असलेल्या कष्टाचे, घामाचे आणि आशेचे सडणे होते. त्यांच्या डोळ्यांतील पाणी आणि शेतातील पाणी एकरूप झाले होते. हे केवळ एका वामनरावांचे दुःख नाही, तर जिल्ह्यातील सुमारे साडेतीनशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान आणि २९४ हेक्टरवरील उद्ध्वस्त झालेल्या फळबागांमधून कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा जो आकडा समोर येतो, तो प्रत्येक शेतकऱ्याच्या काळजाला पीळ पाडणारा आहे.
प्रश्न केवळ अवकाळी पावसाचा नाही, तर या संकटांशी सामना करण्यासाठी आपल्या व्यवस्थेच्या सज्जतेचा आहे. दरवर्षी अशा घटना घडतात, पंचनामे होतात, मदतीच्या घोषणा होतात, पण शेतकऱ्याच्या हाती प्रत्यक्ष काय पडते? आणि तेही वेळेवर? हवामान बदलाचे फटके अधिकाधिक तीव्र होत असताना, आपली कृषी धोरणे, आपत्कालीन व्यवस्थापन आणि नुकसान भरपाईची प्रक्रिया अजूनही कालबाह्यच आहेत का, असा प्रश्न पडतो. ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून जबाबदारी झटकता येईल, पण या आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी आणि त्यानंतरच्या पुनर्वसनासाठी आपण काय ठोस पावलं उचलतो, हे अधिक महत्त्वाचे आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा, पण तोच आज निसर्गाच्या आणि व्यवस्थेच्या दुष्टचक्रात असा काही भरडला जातोय की त्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. तात्काळ पंचनामे आणि नुकसान भरपाई तर आवश्यक आहेच, पण त्यासोबतच अशा अवकाळी संकटांचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन उपायांची, पीक विमा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्याला केवळ ‘मतदार’ न समजता, त्याच्या जगण्याला आधार देणाऱ्या धोरणांची गरज आहे.
आज धाराशिवमध्ये टरबुजं सडली, आंबे गळाले, पण जर आपण वेळीच जागे झालो नाही, तर उद्या शेतकऱ्याचा व्यवस्थेवरचा विश्वास आणि शेती करण्याचा धीरही गळून पडेल. तेव्हा, अजून किती सडलेल्या बागा आणि उद्ध्वस्त झालेली पिकं पाहिल्यावर आपल्या संवेदना जाग्या होणार आणि शेतकऱ्याच्या डोळ्यांतील अश्रू खऱ्या अर्थाने पुसले जाणार, हाच खरा प्रश्न आहे.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह
( आपल्या प्रतिकिया ७३८७९९४४११ या व्हाट्स अँप क्रमांकवर नोंदवा )