धाराशिव – वसंतदादा बँकेच्या ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी २७ जुलै रोजी धाराशिव शहरातील शहर पोलीस ठाण्यात बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक, तत्कालिन व्यवस्थापक दीपक देवकते यांच्यासह संचालक मंडळ, कर्मचारी यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420,409,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालिन चेअरमन तथा मुख्य आरोपी विजय दंडनाईक, व्यवस्थापक दीपक भिवाजी देवकते, संचालक पृथ्वीराज विजय दंडनाईक, सुरेखा विजय दंडनाईक, गणेश दत्ता बंडगर, रामलिंग धोंडीअप्पा करजखेडे, शुभांगी प्रशांत गांधी, कमलाकर बाबूराव आकोसकर, गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, सीए भीमराव ताम्हाणे, विष्णूदास रामजीवन सारडा, महादेव गव्हाणे, लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा हे संशयित आरोपी फरार झाले होते. जिल्हा व सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक यांनी शरणागती पत्करत आज स्वतःहून आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांसमोर हजर झाले.
धाराशिव शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक, व्यवस्थापक दिपक देवकते, संचालक मंडळ व कर्मचा-यांनी संगणमत करून कार्यकर्ते, नातेवाईक, त्यांच्या संस्थेतील कर्मचा-यांचे बनावट फर्म बनवून पुरेशे तारण न घेता लाखो रूपयांचे कर्ज वाटप केले. काही कर्जदारांना तर लाखो रूपयांचे ओव्हर ड्राफ दिले. जवळच्या जवळपास 200 लोकांना लाखो रूपयांचे कर्ज वाटले. काही कर्जदारांच्या कर्जाची रक्कम बचत खात्यावर जमा होताच, त्याच क्षणी व त्याच दिवशी चेअरमन दंडनाईक यांच्या बचत खात्यावर सर्व कर्जाची रक्कम वर्ग केल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्जाची रक्कम ९ वर्षाचा कालावधी लोटला तरी वसूल केली नाही. रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासणीमध्ये गंभीर स्वरूपाच्या बाबी दिसून आल्याने वसंतदादा बँकेचा बँकींग परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला. परिणामी वसंतदादा बँकेचे मोठे ठेवीदार अडचणीत आले. ठेवी मिळणार नाहीत, याचा अंदाज आल्याने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चेअरमनसह व्यवस्थापक, संचालक मंडळ, कर्मचा-यांवर 27 जुलै रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय दंडनाईक यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता , तीन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.