तुक्या – आरं ये पक्या, हातावर गोंदवणारा कुठं भेटलं रं ?
पक्या – मागच्या वर्षी तर मिनीचं नाव गोंदवलं होतं ? आता अजून कुणाचं नाव गोंदवणार हाईस ?
तुक्या – आरं ते बायकुचं नाव झालं, आता दादाचा फोटू गोंदवायचा म्हणतो… …
पक्या – आरं त्याला टॅटू म्हणत्यात..
तुक्या – टॅटू काय अन फोटू काय, एकूण एकच कीं ..
पक्या – आता हे खूळ डोस्क्यात कसं काय शिरलं म्हणायचं ?
तुक्या – आरं बेंबळीच्या विद्या ताईनं बघ कसा ताईचा फोटो कोरला, तसं मला दादाचा कोरायचा हाय…
पक्या – कोंच्या दादाचा ? राणा दादाचा कीं मल्हार दादाचा ?
तुक्या – आरं म्या राणा दादाचा कार्यकर्ता , त्यामुळे त्यांचाच की …
पक्या – हातावर फोटू काढून काय साध्य होणार हाय म्हणायचं ?
तुक्या – तुला नाय कळायचं त्यातलं राजकारण… आरं यामुळे मी दादाचा कट्टर कार्यकर्ता म्हणून सिद्ध होईल की …
पक्या – असं बी तुला दादा कट्टर कार्यकर्ता समजताच कि …
तुक्या – आरं आपल्या गावातील बंड्या , मल्हार दादाचे रोज कान फुंकतोय, म्या ओमदादाचा प्रचार करतोय म्हणून …
पक्या – मागच्या इलेक्शनमधी तर तू ओमदादाचाच प्रचार करत व्हतास की …
तुक्या – आरं मागच्या येळी बीजेपी – सेनेची युती व्हती, आता तुटली की …
पक्या – आता पण बीजेपी – सेनेची युती हाईच की …
तुक्या – आरं त्यायेळी सेना एक व्हती,. आता दोन गट पडलेत… एक बीजेपी बरुबर, एक राष्ट्रवादी बरुबर…
पक्या – राष्ट्रवादी पण महायुतीमध्येच हाय की …
तुक्या – तिथं पण लोच्या झालाय… अजित दादा महायुतीत अन शरद पवार साहेब महाविकास आघाडीबरुबर …
पक्या – अर्र, राजकारणाचा पार चोथा झालाय बघ… एव्हडे पक्ष आणि गट म्या पहिल्यांदा पाहतोय…
तुक्या – येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तर कोण कुठं आहे हेच कळणार नाय बघ,..
पक्या – म्हणून म्हणतोय, राजकीय लोकांचा टॅटू काढण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा टॅटू काढ …
तुक्या – हे अगदी बेस्ट सांगितलास बघ,.. चल मग जावू …
पक्या – जय भवानी, जय शिवाजी….
( या सदराचे लेखक आहेत, धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे )