धारशिव – धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी केली आहे. शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सोयाबीन चोरी प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख रुपये किमतीचे २४.६२ क्विंटल सोयाबीन जप्त करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, फहरान पठाण, चालक पोलीस अंमलदार रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले यांचे पथक काम करत होते. या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शिराढोण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी बबलू फुलचंद पवार (रा. पिंपळगाव डोळा पारधीपिडी, ता. कळंब) याने आपल्या साथीदारांसह मंगरुळ शिवारातील सोयाबीनची चोरी केली आहे.
या माहितीच्या आधारे पथकाने मंगरुळ शिवारात सापळा रचला. तेथे बबलू पवार हा संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्या कबुलीनुसार त्याचा साथीदार दादा फुलचंद पवार यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपींकडून २४.६२ क्विंटल सोयाबीनचे ४५ पोते जप्त करण्यात आले आहेत. या सोयाबीनची किंमत १,००,९४२ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना शिराढोण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.