ढोकी – गावातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी वीजपुरवठ्यातील सततच्या खंडित होण्याच्या समस्येवरून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला निवेदन दिले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत वीजपुरवठा खंडित होत असल्याने आणि शेतीला कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करता येत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
यापूर्वीही अनेकदा निवेदने देऊनही कंपनीने दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांना होणाऱ्या नुकसानीला कंपनी जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ढोकी गावात सौर ऊर्जेचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर गावाला वीजपुरवठा जोडण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, सौर ऊर्जेची लाईट जोडल्यानंतर दिवसा वीजपुरवठा करावा अशी विनंतीही करण्यात आली आहे.
या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर सर्व ग्रामस्थ शेतकरी आणि व्यापारी वर्ग मिळून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.