धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुल्ला हे भंगार घोटाळ्याच्या गंमतीनंतर आता नव्या पराक्रमात रंगले आहेत. नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉ. मुल्ला महिन्यातून पंधरा दिवस धाराशिवलाच असतात. नळदुर्गकडे त्यांचं लक्ष असलं तर ठीक, पण त्यांचं शरीर मात्र फार कमी वेळा तिथे प्रकट होतं. रुग्णालयाचा सगळा कारभार आता प्रभारी डॉक्टरवर चालतोय, तर डॉ. मुल्ला धाराशिवला आराम करीत आहेत.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं तुळजापुरातील नळदुर्ग रोडवर महाआरोग्य शिबिराचा थाट मांडला गेला. मंडप उभारण्यासाठी लाखो रुपये खर्चून थोडा नव्हे, तर १० हजार रुग्णांसाठी जागा ठेवली होती! पण आले किती रुग्ण? मोजून १० ते २०! मंडप मोकळा तर पैसा संपला, पण रुग्ण गायब. आता काय करणार? नवव्या दिवशी मंडप उचलून नेला. शासनाचा पैसा वाटला शेवटी व्यर्थ!
या शिबिराचा मोठा फज्जा तर उडालाच, पण जेव्हा लोकांना खरंच मंडपाची गरज होती, तेव्हा मंडपच गायब! कोजागिरी पौर्णिमेला कर्नाटकातील लोक नळदुर्गमार्गे चालत तुळजापूरच्या दिशेनं जातात. असा योग्य वेळ साधून मंडप लावायला हवा होता, पण तोवर मंडप केव्हाच काढून ठेवलेला!
संपूर्ण घटना पाहता, ‘महाआरोग्य शिबीर’ या नावाखाली एका अदृश्य कारभारानं सरकारी पैसे खर्चवून मंडपाच्या नावाखाली कोणी कमाई केली, हे सांगायला वेगळं काही सांगावं लागणार नाही. आता लोकांना ‘मंडप’ आणि ‘महाआरोग्य’ यांचा काही संबंध आहे का, हे समजण्याचंही प्रयोजन उरलेलं नाही!