नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ‘लक्षवेधी क्रमांक १७५८’ मांडून शहरात वाढलेल्या अमली पदार्थांच्या विळख्याबद्दल चिंता व्यक्त केली. वरकरणी पाहता, हा प्रश्न अत्यंत गंभीर आणि समाजाच्या जिव्हाळ्याचा वाटतो. पण, या लक्षवेधीच्या निमित्ताने राणादादांनी जो ‘बदनामी’चा कांगावा केला आहे, तो पाहता “चोर तो चोर आणि वर शिरजोर” या म्हणीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.
राणा पाटलांचे म्हणणे आहे की, महायुती सरकारच्या माध्यमातून तुळजापूरचा विकास आराखडा आणि रेल्वेचे काम जोरात सुरू आहे, त्यामुळे शहराचा कायापालट होणार आहे. हे मान्य! पण विकासाच्या या गोड गुळाभोवती नको त्या मुंग्या जमल्या आहेत, त्याचे काय? राणा पाटील म्हणतात की, काही राजकीय विरोधक आणि ठराविक प्रसारमाध्यमे राजकीय द्वेषापोटी आणि आर्थिक कारणांसाठी तुळजापूरची आणि पुजाऱ्यांची बदनामी करत आहेत. त्यांनी थेट असा आरोप केला आहे की, ड्रग्स प्रकरणी खोट्या आणि अर्धसत्य बातम्या देऊन शहराची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
पण सत्य काय आहे? पोलिस तपासात या गुन्ह्यात तब्बल ३८ आरोपी निष्पन्न झाले असून ३० जणांना अटक झाली आहे, हे खुद्द मुख्यमंत्र्यांनी कबूल केले आहे. मग, इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोपी सापडत असतील, तर त्याला ‘बदनामी’ म्हणायचे की ‘वास्तवाचा आरसा’?
माध्यमांवर आगपाखड, पण सोयीस्कर मौन
गंमत म्हणजे, राणा पाटील यांनी लेखी निवेदनात माध्यमांवर तोंडसुख घेतले, पण सभागृहात बोलताना मात्र माध्यमांचे नाव घेण्याचे धाडस त्यांना झाले नाही. का? कारण माध्यमांनी जे छापले, ते सत्य होते आणि सत्य पचवणे नेत्यांना जड जात आहे. जेव्हा जेव्हा आरशात विद्रुप चेहरा दिसतो, तेव्हा आरसा फोडण्याची जुनी खोड राजकारण्यांना असते, तेच इथे घडताना दिसत आहे.
राणादादा, तुम्ही म्हणताय की ड्रग्स प्रकरणात विरोधकांचे षडयंत्र आहे. पण या प्रकरणातील अटक आरोपींची कुंडली तपासली, तर नाळेचा संबंध थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचतो, त्याचे काय? तुळजापूरमध्ये ज्या अमली पदार्थ प्रकरणाचा गाजावाजा झाला, त्यातील काही आरोपी हे भाजपचे सक्रीय कार्यकर्ते आहेत, हे लपून राहिलेले नाही.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ड्रग्स प्रकरणात नाव आलेल्या विनोद गंगणे सारख्या व्यक्तीला तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची अधिकृत उमेदवारी कोणी दिली होती? ती उमेदवारी देणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द राणाजगजितसिंह पाटील होते! ज्या हातांनी ड्रग्स माफियांना तिकीट वाटले, त्याच हातांनी आज विधानसभेत “तुळजापूरची बदनामी होतेय” म्हणून कागद फडकवणे, हा निव्वळ ढोंगीपणा नाही का?
पवित्र नगरीला कुणी बाटवले?
आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत अमली पदार्थांचा धंदा फोफावला, हे पाप कोणाचे? ज्या कार्यकर्त्यांना तुम्ही राजकीय ताकद दिली, जे तुमच्या पक्षाचे झेंडे घेऊन फिरतात, तेच जर एमडी (मेफेड्रॉन) सारखे विष तरुणांना विकत असतील, तर त्याची नैतिक जबाबदारी तुमची नाही का? माध्यमांनी हे सत्य बाहेर आणले म्हणून ते ‘बदनाम’ झाले का?
तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय समितीची मागणी केली, हे चांगलेच झाले. पण या समितीने केवळ ड्रग्स पेडलर्सचीच नव्हे, तर त्यांना राजाश्रय देणाऱ्या ‘राजकीय गॉडफादर्स’चीही चौकशी करावी. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.
केवळ विरोधकांवर आणि पत्रकारांवर खापर फोडून तुळजापूरचे पावित्र्य राखले जाणार नाही. राणादादा, जर तुम्हाला खरंच तुळजापूरची काळजी असेल, तर आधी आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या कार्यकर्त्यांची झाडाझडती घ्या. गुन्हेगारांना तिकिटे देणे थांबवा आणि मगच विधानसभेत अन्यायाची भाषा करा. तोपर्यंत हा ‘कांगावा’ जनतेला समजतोय, हे लक्षात ठेवा!
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह






