धाराशिव जिल्ह्यात खंडणीखोरीचा एक सुळसुळाट सुरू असून, त्याचा केंद्रबिंदू बनलेला आहे आशिष विशाळ! कोणत्याही कायदेशीर उत्पन्नाचा स्रोत नाही, कसलीही नोकरी नाही, तरीही बँक खात्यात कोटींच्या ठेवी आणि लाखोंच्या गाड्या! हा पैसा आला कुठून? याचा सुगावा लागत नाही, पण शासकीय अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणे, तक्रारींच्या माध्यमातून पैशांची उकळपट्टी करणे आणि मोठ्या नेत्यांच्या छत्रछायेखाली वावरणे – हेच त्याचे प्रमुख उद्योग आहेत.
आ. सुरेश धस आणि आशिष विशाळ – हात वर की हातमिळवणी?
एकेकाळी धाराशिव, बीड आणि लातूरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार असलेल्या आ. सुरेश धस यांच्या छायेत हा आशिष विशाळ बहरला. त्यांच्या लेटरपॅडचा गैरवापर करून धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात खोट्या तक्रारी करणे, चौकशी लावणे, आणि नंतर खंडणी मागणे – हेच त्याचे सूत्र होते. यातूनच तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण येळगट्टे यांना सहा महिने तुरुंगाची हवा खावी लागली.
मात्र, यावरून काहीही धडा न घेता, हा ‘तक्रारीबहाद्दर’ व्यापारी, बिल्डर, सरकारी कर्मचारी अशा अनेकांना लक्ष्य करत राहिला. सरतेशेवटी त्याच्या या धक्कादायक कारवायांना जरांगे समर्थक कंटाळले आणि भररस्त्यात त्याला धडा शिकवला. पण जणू काही हे अपयश पचवायला त्याला जमत नव्हते! मुंबईत विधीमंडळ अधिवेशनाच्या वेळी तो पुन्हा आ. सुरेश धस यांच्या मागे फिरताना दिसला आणि त्याचे खेळखंडोळ झाले.
एकीकडे नकार, दुसरीकडे साथ – धस साहेब, हे काय चाललंय?
आ. सुरेश धस यांनी यापूर्वीच “आशिष विशाळशी माझा काहीही संबंध नाही” असे जाहीर केले होते. परंतु, आता जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत त्यांनी स्पष्टपणे “तो माझा सहकारी आहे” असे म्हटले आहे! मग प्रश्न असा आहे की, आधी नाते नाकारायचे आणि आता उघड कबुली द्यायची – या उलटसुलट भूमिकेमागे कोणता डाव आहे?
जर सुरेश धस यांचा विशाळशी काहीही संबंध नव्हता, तर तो त्यांच्या लेटरपॅडचा वापर कसा करत होता? त्याच्यावर आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही? पोलीस आणि जिल्हा प्रशासन गप्प का बसले?
दबाव कुणाचा? चौकशी कधी?
मनसेचे पाशाभाई शेख आणि सामाजिक कार्यकर्ते सुजित ओव्हाळ यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे, पण ती अद्याप धूळखात का पडली आहे? आशिष विशाळच्या वर कोणाचा वरदहस्त आहे, ज्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही? जर एक सामान्य नागरिक दोन कोटींच्या ठेवी ठेवतो आणि लाखोंच्या गाड्या बाळगतो, तर त्याची उत्पन्नाची चौकशी का केली जात नाही?
आता हे थांबलं पाहिजे!
हा गुन्हेगारीचा खेळ संपवायचा असेल, तर यामागील मास्टरमाइंड कोण आहेत, हे उघड व्हायला हवं. केवळ आशिष विशाळलाच लक्ष्य करून उपयोग नाही, तर त्याला अभय देणाऱ्या राजकीय नेत्यांचीही पोलखोल झाली पाहिजे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास जनतेचा संताप उफाळेल, आणि मग रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही!
सवाल एवढाच – कायदा खरोखरच अंध आहे की, निवडक लोकांसाठीच तो दुर्लक्ष करतो?