धाराशिव: शहरात राजकीय रंगमंचावर नुकतेच फेसबुक पोस्टचे नाट्य घडले. शिवसेना (उबाठा) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टने, त्यांच्या पक्षनिष्ठेचा प्रश्न निर्माण केला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटोचा अभाव होता, आणि लगेचच चर्चा जोर धरू लागली की, “ओमराजे पळाले का?”
दुपारी १२:00: पोस्ट आली आणि राजकीय चर्चेला चिखलफेकचा नवा विषय मिळाला.
त्यानंतर, ३:00 वाजता: पोस्ट एडिट केली गेली, ठाकरे पिता-पुत्राचा फोटो जोडला गेला, आणि जुनी पोस्ट गायब झाली. पण चर्चेचा बार उधळल्यावर तो परत उचलता येत नाही, हे कोण सांगणार?
दरम्यान, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील चर्चा पेटवण्यासाठी “ओमराजे महायुतीचेच” अशी तिखट प्रतिक्रिया दिली. मीडियाला अधिक फोडणी मिळाली, आणि ओमराजेंनी शिंदे गटात जाण्यासाठी तयारी केली असल्याचा अंदाज वर्तवला गेला.
“मी ठाकरेचाच! आणि टायगर कोणाचा, ते सांगा!”
दुपारी पत्रकारांशी बोलताना ओमराजेंनी हास्याचे फवारे उडवत चर्चांचा खरपूस समाचार घेतला. “मी ठाकरे परिवाराच्या आशीर्वादाने आमदार आणि खासदार झालोय, गद्दारी नाही करणार.” असं म्हणत त्यांनी पक्षनिष्ठेचं प्रमाणपत्र दिलं.
त्यासोबतच, धाराशिवमधल्या ‘ऑपरेशन टायगर’ वर त्यांनी मिश्कील टोला लगावत, धाराशिव जिल्ह्यात आलेला “टायगर आधी पकडा, मग माझ्या राजकीय फोटोशॉपवर बोला,” असं म्हणत त्यांनी मीडियालाही डिवचलं.
फेसबुकची पोस्ट, मीडियाचा गोंधळ, आणि ओमराजेंची खिल्ली… धाराशिवची साप्ताहिक करमणूक ठरली!