धाराशिव: महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केलेल्या एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. धाराशिव येथे पक्षाच्या वतीने आज जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करत शिवसैनिकांनी सरकारच्या भाडेवाढीच्या निर्णयाचा निषेध केला. एकीकडे सरकार महिलांना ५० टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देत असल्याचे भासवत आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य प्रवाशांवर १५ टक्के भाडेवाढ लादून त्यांचा खिसा कापत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.
“सरकार नुसत्या योजना जाहीर करत आहे. एसटीमध्ये प्रवास करणारा हा सामान्य माणूस आहे. भाडेवाढ करून सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचे काम केले आहे. एसटी महामंडळाचे सरकारकडे जे देणं थकीत आहे ते देणं दिलं तर भाडेवाढ करण्याची गरज नाही,” असे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले.
“महायुती सरकारने इलेक्ट्रिक बसमध्ये घोटाळा केला आहे. त्यामुळे महामंडळ तोट्यात गेले आहे. तो तोटा भरून काढण्यासाठीच प्रवाशांच्या माथी भाडेवाढ लादली आहे. या सरकारला एसटीचे खाजगीकरण करायचे आहे,” असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला.
आंदोलकांनी ‘सरकार मस्त, एसटी भाडेवाढीने जनता त्रस्त’, ‘रद्द करा, रद्द करा एसटी भाडेवाढ रद्द करा’, ‘सेवा नाही, सुविधा नाही, फक्त जनतेची लूट आहे’, ‘लाल परीची लूट थांबवा, एसटी भाडेवाढ परत घ्या’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात शिवसैनिकांसह ग्रामीण भागातील प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Video