बेंबळी : किरकोळ वादाच्या कारणावरून एका २९ वर्षीय तरुणाला लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉड, दगड आणि काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील महाळंगी येथे शुक्रवारी (ता. १७) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी (ता. १९) बेंबळी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज पोपट कोळी (वय २९, रा. महाळंगी, ता. जि. धाराशिव) असे मारहाण होऊन गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे. तर सुभाष जट्टाप्पा कोळी, महादेव सुभाष कोळी आणि पांडुरंग सुभाष कोळी (तिघेही रा. महाळंगी, ता. जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १७) रात्री आठ वाजेच्या सुमारास फिर्यादी मनोज कोळी हे महाळंगी येथील खंडोबा मंदिरासमोरील चौकात उभे होते. त्यावेळी आरोपी सुभाष कोळी, महादेव कोळी आणि पांडुरंग कोळी यांनी त्यांच्याशी किरकोळ वादातून हुज्जत घातली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी संगनमत करून मनोज यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोखंडी रॉड, दगड आणि काठीने त्यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. एवढेच नाही तर, त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तेथून पोबारा केला.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मनोज कोळी यांनी रविवारी (ता. १९) बेंबळी पोलिस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दिली. या प्रथम खबरेवरून बेंबळी पोलिसांनी आरोपी सुभाष कोळी, महादेव कोळी आणि पांडुरंग कोळी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलिस करत आहेत.





