धाराशिव – राज्यभरातील २० लाख मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. आता गोरगरीब कुटुंबातील मुलांनाही उच्च शिक्षण मोफत मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
धाराशिव तालुक्यातील इर्ला, सारोळा, किणी आदी गावांमध्ये दिवाळी फराळ भेटीदरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. १२ वीनंतर मुलींना अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसीसह ६४२ वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये मोफत शिक्षण देण्यात येत आहे. आर्थिक अडचणींमुळे एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारने १८०० कोटी रुपयांचा भार उचलला आहे.
आमदार पाटील म्हणाले की, राज्यात ५३०० हून अधिक उच्च महाविद्यालये आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक मुलांना शिक्षण घेता येत नाही. त्यांना अर्धवट शिक्षण सोडून रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. मुलींप्रमाणेच मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी. यामुळे ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळेल आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री यांच्याकडे मुलांनाही शैक्षणिक शुल्कात १०० टक्के सवलत देण्याची मागणी केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. गरजवंत मराठा मुलांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय आवश्यक आहे. आपल्या हक्काच्या सरकारकडून हा निर्णय नक्की करून घेऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.