धाराशिव: घाटंग्री येथे दोन गटात झालेल्या मारामारीत एका व्यक्तीला गंभीर जखमी करण्यात आले आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पना दिलीप हराळे (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे सासरे एकनाथ भिमा हराळे यांना केशव महादेव हराळे, महादेव रावण हराळे, वैष्णवी केशव हराळे, सहदेव प्रभु हराळे, राजुबाई महादेव हराळे आणि हणुमंत शहाजी हराळे यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ केली. तसेच लाथा, बुक्क्या, रॉड, काठी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले.
या मारामारीच्या घटनेत एकनाथ हराळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कल्पना हराळे यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भा.द.वि. कलम 109, 118(1) 115(2), 352, 189(2),191(1), 191(3) आणि 190 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
जातियवादी शिवीगाळ आणि मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल
धाराशिव : घाटंग्री येथे दोन व्यक्तींनी एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बंटी राठोड आणि अनिल राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुसूम गोरख कांबळे (वय 45) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा गोविंद याला आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्या व रॉडने मारहाण करून जखमी केले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या मारामारीत गोविंद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कुसूम कांबळे यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.द.वि. कलम 118(1) 115(2), 351(2)(3), 352, 3(5) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 3(1)(आर) व 3(1)(एस) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.