तामलवाडी – तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथे सरकारी आरोग्य उपकेंद्र उभारणीच्या कामात अडथळा निर्माण करून कामगारांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. साईनाथ संगमेश्वर जळकोटे (वय 32) यांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, केशेगाव येथे कार्यरत असलेले डॉ. जळकोटे हे 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम सुरू असताना घटनास्थळी आले. आरोपी शिवानंद मोतीराम गिरी (वय 32), धनाजी हिरागुवा गिरी (वय 50), राजेंद्र मोतीराम गिरी (वय 47) आणि केशरबाई मोतीराम गिरी यांनी बांधकाम चालू असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच, बांधकाम कामगार रामेश्वर सुरवसे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर लाथाबुक्यांनी हल्ला चढवून त्यांना शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. जळकोटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 132, 115(2), 351(2)(3), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.