धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये मोठा गोंधळ समोर आला आहे. या महाविद्यालयात १६ विविध पदांवर काम करणाऱ्या १३७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाच्या आत तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या ऑर्डर देण्यात आल्या आहेत. परवा ,या कर्मचाऱ्यांना नवीन “स्मार्ट कंपनी”ची ऑर्डर देण्यात आली आणि त्यासोबत आयकार्डही वितरित करण्यात आले.
गेल्या वर्षभरात या कर्मचाऱ्यांना “ब्रिक्स” आणि “एनर्जी गो” या कंपन्यांकडूनही ऑर्डर देण्यात आल्या होत्या. प्रत्येक वेळी नवीन कंपनीच्या नावाने प्रोसेस फीसच्या नावाखाली कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे संकट असल्यामुळे कोणीही या प्रक्रियेविरोधात तक्रार करण्यास पुढे येत नाही.
विशेष म्हणजे, या प्रकारात एकाच मॅनेजरकडून तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या ऑर्डर दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. शैक्षणिक अर्हता नसलेल्या व्यक्तींनाही पैसे घेऊन ऑर्डर देण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण काही कर्मचाऱ्यांना आवश्यक ती प्रशिक्षण मिळालेली नसल्याचे उघड झाले आहे.
या मॅनेजरसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे आहे. अधिष्ठता मॅडमची मूक संमती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व भोंगळ कारभार सुरु आहे. कुणाचा पायपोस कुणाला नाही.
या परिस्थितीत, शासकीय स्तरावर शैक्षणिक अर्हता तपासण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमण्याची गरज भासत आहे, ज्यामुळे महाविद्यालयातील या गोंधळाला पूर्णविराम मिळू शकेल.