उमरगा – तालुक्यातील तुरोरी येथे 20 ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजता झालेल्या एका गंभीर मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत अल्लाउद्दीन सलीम शेख (वय 33 वर्षे, रा. तुरोरी) यांना शरद कदम, अंबिका शरद कदम, शशीकांत शरदचा मेव्हुणा, वंदा शरदची सासू, विष्णु शंशीकांतचा मित्र आणि दोन अनोळखी इसमांनी मागील भांडणाच्या कारणावरून बेदम मारहाण केली.
फिर्यादी अल्लाउद्दीन शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच काठीने देखील जबर मारहाण केली. या घटनेत अल्लाउद्दीन शेख गंभीर जखमी झाले आहेत. इतकेच नव्हे तर, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या अल्लाउद्दीन यांच्या आई, पत्नी, भाऊ आणि भाच्च्यांना देखील आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली. या हिंसाचारा दरम्यान आरोपींनी अल्लाउद्दीन आणि त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देखील दिली.
या घटनेनंतर अल्लाउद्दीन शेख यांनी 21 ऑगस्ट रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम 118(1), 333, 115(2), 352, 351(2), 351(3), 189(2), 191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे तुरोरी गावात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.