धाराशिव: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होत आहे. आगामी महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत उष्माघात प्रतिबंध आणि उपचारांसाठी विविध उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक आरोग्य शिक्षण देण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेमार्फत उष्णतेच्या झळांपासून बचाव करण्यासाठी पुढील उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत:
- कोल्ड रूमची व्यवस्था: जिल्ह्यातील 5 ग्रामीण रुग्णालये, 6 उपजिल्हा रुग्णालये, 44 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 2 शहरी आरोग्य केंद्रांमध्ये कोल्ड रूमची स्थापना करण्यात आली आहे.
- औषध साठा: उष्माघातावरील उपचारांसाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.
- विशेष कार्यदल: उष्माघात नियंत्रणासाठी कार्यदल स्थापन करण्यात आले आहे.
- प्रसिद्धी साहित्य: नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी सर्व आरोग्य संस्थांना प्रसिद्धी साहित्य वितरित करण्यात आले आहे.
उष्माघातापासून बचावासाठी महत्त्वाच्या सूचना:
काय करावे:
- नियमितपणे पुरेसे पाणी प्या आणि प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवा.
- हलक्या रंगाचे, सैलसर आणि हलक्या वजनाचे कपडे परिधान करा.
- उन्हात बाहेर पडताना टोपी, गॉगल आणि छत्रीचा वापर करा.
- घरात गारवा टिकवण्यासाठी ओले पडदे, पंखा आणि कूलरचा वापर करा.
- पाळीव प्राण्यांना सावलीत आणि थंड ठिकाणी ठेवा.
काय करू नये:
- दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर जाणे टाळा.
- उन्हात कष्टाची कामे करण्याचे टाळा.
- लहान मुलांना बंद वाहनात सोडू नका.
- गडद रंगाचे आणि तंग कपडे वापरणे टाळा.
- अत्यधिक प्रथिनेयुक्त किंवा शिळे अन्न खाणे टाळा.
- मद्य, चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन कमी करा.
उष्माघाताची लक्षणे:
- प्रौढांमध्ये: 104 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त तापमान, तीव्र डोकेदुखी, स्नायूंचे आखडणे, उलट्या, चक्कर, हृदयाचे ठोके वाढणे.
- लहान मुलांमध्ये: आहार न घेणे, चिडचिड, लघवीचे प्रमाण कमी होणे, त्वचा कोरडी होणे, रक्तस्त्राव.
कोणीही उष्माघाताचा बळी ठरू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी केले आहे. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक 108 किंवा 102 वर संपर्क साधावा.