तुळजापूर शहरात सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांच्यावर दोन वेळा हल्ला करणाऱ्या गावगुंड पीके उर्फ प्रशांत कांबळे याच्यावर अखेर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1 मार्च 2025 रोजी, राजाभाऊ माने आणि त्यांचा पोलिस अंगरक्षक स्कुटीवरून जात असताना गावगुंड प्रशांत कांबळे आणि त्याच्या साथीदाराने त्यांचा रस्ता अडवून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती. राजाभाऊ माने यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, मात्र पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
यानंतर 6 मार्च 2025 रोजी, प्रशांत कांबळेने भर रस्त्यात राजाभाऊ माने यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या पोलिस अंगरक्षकाने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यालाही मारहाण करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद असूनही पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली होती.याबाबत धाराशिव लाइव्हने बातमी देताच, तातडीने गुन्हा दाखल केला.
या कलमाखाली दाखल झाला गुन्हा
भारतीय न्याय संहिता कलम १२७ ( २ ) , २८१, ३२४ ( २ ), १२१ ( १ ), ११५ ( २ ), ३५१ ( ३), ३५२, १८४
पीकेवर आधीपासूनच गंभीर गुन्हे दाखल
प्रशांत कांबळे याच्यावर तुळजापूर, नळदुर्ग आणि इतर पोलीस ठाण्यात आधीपासूनच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र, राजकीय आश्रयामुळे तो वारंवार कायद्याच्या कचाट्यातून सुटत होता.
स्थानिक राजकीय नेत्याचा हस्तक
पीके उर्फ प्रशांत कांबळे हा एका स्थानिक राजकीय नेत्याचा हस्तक असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच तो वारंवार गुन्हे करत असूनही त्याच्यावर कठोर कारवाई टाळली जात होती.
तडीपारची मागणी तीव्र
धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात गुन्हेगारी व अवैध धंद्यांमध्ये सक्रिय असलेल्या या गुन्हेगाराला तात्काळ तडीपार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संघटनांनी यासंदर्भात पोलिसांकडे निवेदन देण्याची तयारी दर्शवली आहे.
पोलिसांची पुढील भूमिका महत्त्वाची
या प्रकरणी पोलिसांनी पुढे काय कारवाई करणार, गावगुंडाला तडीपार करण्याची मागणी मान्य होणार का, आणि स्थानिक राजकीय संबंधांमुळे केस कमकुवत केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.