ती म्हणजे कोण? रोज सकाळी उठून सगळ्यांना हाक मारणारी, घर आवरणारी, स्वयंपाक करणारी, ऑफिसला धावणारी, मुलांच्या गृहपाठाच्या मागे लागणारी, नवऱ्याच्या टिफिनसाठी लवकर उठणारी, घरातील मोठ्यांना औषधं आठवण करून देणारी, आणि स्वतःला नेहमी शेवटच्या नंबरवर ठेवणारी “ती”!
ती कधी आई असते, कधी बहीण, कधी बायको, कधी मुलगी… पण प्रत्येक रूपात “ती” फक्त देत राहते. तिचं स्वतःचं काही असतं का? तिच्या मनात असंख्य स्वप्नं असतात, पण ती स्वतःलाच सांगते, “हे नंतर! आधी घर, आधी परिवार!”
ती लढते, झगडते, पण कधी थकत नाही… का?
समाजाचा मोठा प्रश्न आहे—ती कधीच थकत नाही का?
थकतेच ना! पण ती दाखवत नाही. ती मानसिक आणि शारीरिक जखमांवर फुंकर घालायला कोणाला बोलवत नाही. तिला माहित आहे की लोक सहानुभूती देतील, पण मदत नाही. सोशल मीडियावर तिला reels मधून सहानुभूती मिळेल, तिच्या संघर्षाचा “content” होईल, पण तिच्या वेदनांचं काय?
तिच्या जखमा… फक्त तिलाच कळतात!
तिचं शरीर जखमी होतं, मन तुटतं, तरीही ती उभी राहते. समाजाने तिच्यावर हजारो शिक्के मारले तरी ती त्यांना पुसत पुढे जात राहते.
- स्त्रीचं सौंदर्य: ती सुंदर असेल तर लोक तिला “आयटम” म्हणतात, साधी असेल तर “गावंढळ” म्हणतात.
- स्त्रीचा आवाज: ती स्पष्ट बोलेल तर “उद्धट” म्हणतात, शांत राहील तर “बिचारी” म्हणतात.
- स्त्रीचं करिअर: ती घर सांभाळेल तर “नोकरी करत का नाही?” म्हणतात, नोकरी करेल तर “घराकडे लक्ष नाही” म्हणतात.
म्हणजे जिकडे तिकडे फक्त टोमणे!
तिच्या प्रत्येक रूपाला सलाम!
स्त्री ही फक्त घरकाम करणारी, नवऱ्याची सेवा करणारी, किंवा मुलं वाढवणारी नाही. ती जग उभं करणारी आहे!
- ती तलवारसारखी कणखर आहे!
- ती सावलीसारखी मायेची आहे!
- ती अंगारासारखी भडक आहे!
- ती समुद्रासारखी विशाल आहे!
महिला दिन म्हणजे एक दिवसाचा उत्सव नाही, तर तिच्या कर्तृत्वाचा गौरव!
महिला दिनाला फक्त “Happy Women’s Day” म्हणून सेलिब्रेशन करून उपयोग नाही, तिच्या अस्तित्वाचा खराखुरा सन्मान होणं गरजेचं आहे!
म्हणून आजच्या दिवशी आपण एक शपथ घेऊया—
👉 तिच्या प्रत्येक कष्टाचं चीज करू
👉 तिला “कमजोर” म्हणण्याऐवजी तिची ताकद ओळखू
👉 तिच्या निर्णयांचा आदर करू
कारण ती फक्त देत राहते… आणि आपण?
- सुदीप पुणेकर