तुळजापूरमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांपासून ड्रग्जचा गोरखधंदा निर्भयपणे सुरू आहे. हा व्यवसाय पोलीस प्रशासनाच्या छत्रछायेखालीच फोफावला का, याचा ठोस तपास आवश्यक आहे.
६ लाखांचा हप्ता आणि पोलिसांची मिंधेगिरी
सुमारे सहा महिन्यांपूर्वी सध्या अटकेतील एका आरोपीला तुळजापूर पोलिसांनी अटक केली होती. मात्र, त्याच्याकडून ६ लाख रुपये घेऊन त्याला सोडण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. एवढेच नाही, तर त्यानंतर पोलिसांनी दरमहा हप्ता निश्चित करून ड्रग्जचा व्यापार बिनधास्त सुरू राहू दिला.
तामलवाडी पोलिसांनी उघडकीस आणला मोठा घोटाळा
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिसांनी तीन जणांना अटक करताच संपूर्ण बिंग फुटले. तामलवाडी पोलिसांच्या कारवाईमुळे पोलीस खात्यातील सडलेली यंत्रणा समोर आली. यामुळे तुळजापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांची धाराशिव येथे बदली करण्यात आली आहे.
खांडेकरांवर कारवाई होणार का? बडे मासे अजूनही मोकाट!
तामलवाडी पोलिसांनी आतापर्यंत ९ आरोपींना अटक केली असली, तरी या ड्रग्ज रॅकेटमागील बडे मासे अद्याप मोकाट आहेत.
मुख्य प्रश्न असा आहे की, पोलीस खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? खांडेकरांवरील आरोपांची चौकशी होणार की हा विषय दडपला जाणार?
पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत?
तुळजापूर पोलीस कोणाच्या छायेखाली काम करत होते? कोणते स्थानिक नेते किंवा धनदांडगे या प्रकरणाच्या मुळाशी आहेत? या प्रश्नांची उत्तरे मिळणं अत्यंत गरजेचं आहे.
तामलवाडी पोलिसांनी मोठ्या धाडसाने ही कारवाई केली असली, तरी राजकीय दबाव आणि पोलीस दलातील दलाल यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पाहायचं फक्त एवढंच, हे ड्रग्ज रॅकेट संपुष्टात येईल की पुन्हा जुन्याच वळणावर चालू राहील?