परंडा : मत्स्य आयुक्तांकडे तक्रार अर्ज का दिला, याचा राग मनात धरून गैरकायद्याची मंडळी जमवून एका महिलेवर लोखंडी कोयता आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी येथे घडली. यावेळी आरोपींनी महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि पतीच्या खिशातील १५ हजार रुपयांची रोकड असा ऐवज लुटून नेला. या प्रकरणी रविवारी (ता. १०) आंबी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाबाई वासुदेव लष्कर (वय ४०, रा. खंडेश्वरवाडी, ता. परंडा, जि. धाराशिव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. बुधवारी (ता. ६) संध्याकाळी साडेसात ते पावणेआठ वाजेच्या सुमारास खंडेश्वरवाडी येथील तळ्याजवळील शेतात सोनाबाई लष्कर या असताना हा प्रकार घडला.
आरोपी रेवण भोसले, चंद्रकांत भोसले, पृथ्वीराज भोसले, विशाल भोसले (सर्व रा. ताकमोडवाडी), देवा सिताराम डुकळे, नितीन लक्ष्मण जाधव, अमर लक्ष्मण जाधव, लक्ष्मण जाधव (सर्व रा. उंडेगाव, ता. परंडा) आणि गोपीनाथ दगडे (रा. सालसे, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी संगनमत करून त्यांना गाठले. ‘तू मत्स्य आयुक्त, धाराशिव यांच्याकडे तक्रारी अर्ज का दिला?’ असा जाब विचारत या नऊ जणांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी, लोखंडी कोयता आणि दगडाने मारहाण करून सोनाबाई यांना गंभीर जखमी केले.
दागिने आणि रोख रक्कम पळवली
मारहाण केल्यानंतर आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी सोनाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, नेकलेस, कानातील फुले-झुबे आणि त्यांचे पती वासुदेव यांच्या खिशातील १५ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली. तसेच ‘तुला जिवे ठार मारू’, अशी धमकी देऊन सर्व आरोपी तिथून पसार झाले.
या भयंकर घटनेनंतर सोनाबाई लष्कर यांनी रविवारी (ता. १०) आंबी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील नऊ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११९(१), ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३३३, ३५२, ३५१(२)(३) सह शस्त्र कायदा (आर्म ॲक्ट) ४/२५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आंबी पोलीस करत आहेत. गर्दी करून महिलेवर शस्त्राने हल्ला केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



