धाराशिव: तालुक्यातील हिंगळजवाडी येथे १ मे २०२५ रोजी दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी ढोकी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.
राहुल मोरे यांची फिर्याद:
राहुल भास्कर मोरे (वय ३३, रा. हिंगळजवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १ मे रोजी रात्री सुमारे ८:२० वाजता हिंगळजवाडी येथील एका ऑनलाईन सेंटरसमोर ही घटना घडली. अजित अरुण नाईकनवरे, गणेश राम नाईकनवरे, संजय सिताराम नाईकनवरे, सुमित संजय नाईकनवरे आणि आकाश सुर्यकांत नाईकनवरे (सर्व रा. हिंगळजवाडी) यांनी मागील भांडणाच्या कारणावरून गैरकायदेशीर जमाव जमवून राहुल मोरे यांना शिवीगाळ केली. तसेच, लाथाबुक्क्यांनी, काठीने आणि प्लास्टिक पाईपने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून ढोकी पोलिसांनी अजित नाईकनवरे यांच्यासह पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), १८९(२), १९१(२), १९०, ११५, ३५२, ३५१(२), ३५१(३) सह अपंग व्यक्ती अधिनियम कलम ९२(अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अजित नाईकनवरे यांची फिर्याद:
दुसरी फिर्याद अजित अरुण नाईकनवरे (वय ४४, रा. हिंगळजवाडी) यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, १ मे रोजी रात्री सुमारे ८:३० वाजता हिंगळजवाडी बसस्थानक परिसरातील पाटनट्टी येथे राहुल भास्कर मोरे आणि प्रणव सतिश शिंदे (दोघे रा. हिंगळजवाडी) यांनी त्यांना अडवले. “तू सोयाबीन, कापूस अनुदान घोटाळा कितीही उघडकीस आणला तरी माझे काही वाकडे होणार नाही,” असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीनुसार, ढोकी पोलिसांनी राहुल मोरे आणि प्रणव शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५, ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या दोन्ही प्रकरणांचा तपास ढोकी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. जुना वाद आणि कथित अनुदान घोटाळ्याच्या आरोपावरून हाणामारी झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.