धाराशिव – जेवण करण्यासाठी आलेल्या सहा जणांनी फोटो काढण्याच्या बहाण्याने हॉटेल कर्मचाऱ्याला गाडीजवळ बोलावून, त्याचे हात काचेत अडकवून गाडीसोबत फरफटत नेले. त्यानंतर कपाळावर पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी देत त्याला गंभीर मारहाण केली आणि त्याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना धाराशिवमध्ये घडली आहे.
ही घटना बुधवार, दि. २३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास वडगाव शिवारातील हॉटेल भाग्यश्री येथे घडली. याप्रकरणी नागेश विकास मडके (वय ३३ वर्षे, मूळ रा. बार्शी, ह.मु. हॉटेल भाग्यश्री, धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात सहा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागेश मडके हे हॉटेल भाग्यश्री येथे काम करत असताना, पांढऱ्या-निळ्या रंगाच्या एर्टिगा गाडीतून सहा जण जेवणासाठी आले. जेवण झाल्यानंतर त्यांनी फोटो काढण्याचा बहाणा करून नागेश यांना गाडीजवळ बोलावले. नागेश गाडीजवळ येताच, आरोपींनी त्यांचे दोन्ही हात गाडीच्या काचेत अडकवले आणि शिवीगाळ करत त्यांना गाडीसोबत फरफटत नेले.
यानंतर आरोपींनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने नागेश यांच्या कपाळावर पिस्तूल लावले, त्यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले आणि त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन ओढून घेऊन पोबारा केला. या धक्कादायक प्रकारानंतर नागेश मडके यांनी शनिवारी, दि. २६ जुलै रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११५(२), ११९(१), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३ आणि २५ अन्वये सहा अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.