शिराढोण – वाठवडा शिवारातील हॉटेल निसर्ग येथे एका व्यक्तीस मारहाण करून जखमी करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सोमनाथ छत्रभुज टिंगरे (वय ३३, रा. वाठवडा, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ७ मार्च २०२५ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास हॉटेल निसर्ग येथे त्यांचे बंधू लक्ष्मण टिंगरे व मित्र गणेश पुड यांच्यासोबत असताना, आरोपी सागर अंबत्रषी बचाटे, अजय भागवत घुटे, आदिनाथ चंद्रकांत पठाडे, विजय भागवत घुटे (सर्व रा. मुरुड, जि. लातूर) यांनी गावातील लोकांबद्दल अपशब्द का बोलता, या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड व लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.
यावेळी आरोपींनी “मुरुडला कसे शिकवतो ते बघतो” अशी धमकी दिली आणि फिर्यादीचा सॅमसंग मोबाइल फोडून नुकसान केले. या प्रकरणी सोमनाथ टिंगरे यांनी ११ मार्च रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 118(2), 118(1), 115(2), 352, 351(2), 324(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास शिराढोण पोलीस करत आहेत.
शेत रस्त्यावरून वाद; तिघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल
तुळजापूर – शेत रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून वाद झाल्याने एका व्यक्तीला मारहाण करून जखमी केल्याची घटना सिंदफळ शिवारात घडली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अमर बबन क्षिरसागर (वय ३५, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ११ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास ते शेत रस्त्यावरून जात असताना, आरोपी विठ्ठल लिंबाजी क्षिरसागर, विलास विठ्ठल क्षिरसागर आणि विकास विठ्ठल क्षिरसागर (सर्व रा. सिंदफळ, ता. तुळजापूर) यांनी त्यांच्याशी वाद घातला.
यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेबाबत अमर क्षिरसागर यांनी ११ मार्च रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 118(1), 115(2), 352, 351(3), 126(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.