नळदुर्ग : नळदुर्ग-अक्कलकोट हा ३२ किलोमीटरचा रस्ता आहे. त्यापैकी २१ किलोमीटर रस्ता सोलापूर जिल्ह्यात आणि ११ किलोमीटर रस्ता धाराशिव जिल्ह्यात आहे. सोलापूर हद्दीतील रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी धाराशिव हद्दीतील ११ किलोमीटर रस्त्याचे काम काही दलालांनी अडवले होते. मात्र, धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर हे काम सुरू झाले आणि आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या दलालांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली असून त्यांचे कटकारस्थान उघडकीस आले आहे. “तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले” अशी त्यांची अवस्था झाली आहे.
दरम्यान, नळदुर्गपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर एका घराच्या समोर दलालांच्या सांगण्यावरून अवैध स्पीड ब्रेकर उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे केवळ एका घरासाठी हे स्पीड ब्रेकर टाकण्यात आले असून त्यावर कोणताही सूचनाफलक नाही, तसेच व्हाइट पट्ट्याही नाहीत. परिणामी, वाहनचालकांना याचा अंदाज येत नाही आणि अनेक वाहने या स्पीड ब्रेकरवर आदळून अपघात होत आहेत.
काल रात्री अशाच एका अपघातात एका मोटारसायकलस्वाराला गंभीर दुखापत झाली असून त्यातील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक रहिवाशांनी याचा तीव्र निषेध नोंदवला असून प्रशासनाने तातडीने हे स्पीड ब्रेकर हटवण्याची मागणी केली आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अशा अनधिकृत स्पीड ब्रेकरमुळे अपघात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाकडून दुर्लक्ष?
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. अशा अवैध स्पीड ब्रेकरमुळे अनेक वाहनचालक आणि प्रवासी अपघातग्रस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तत्काळ याची दखल घेऊन हे स्पीड ब्रेकर हटवावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.