धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुधा साळुंके यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांच्या कारभाराची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी उस्मानाबाद जिल्हा मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त यांच्यासह विविध प्रशासनिक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
संघटनेच्या आरोपानुसार, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे. शिक्षकांच्या बदलीसाठी मोठ्या प्रमाणावर विलंब केला जात असून, आर्थिक व्यवहार झाल्यानंतरच त्या प्रक्रिया पूर्ण केल्या जात असल्याचा आरोप आहे.
शिक्षकांच्या आत्मदहनाच्या टोकाच्या कृतीमुळे प्रशासनाची हालचाल
संघटनेच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, समता विद्यालय, सापनाई ता. कळंब येथील एका सहशिक्षकाची बदली चांदणी विद्यालय, आसू ता. परंडा येथून करण्यात आली होती. मात्र, या बदलीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांचा कालावधी घेतला. विलंबामुळे संबंधित शिक्षकाने आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतरच निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
विद्यार्थी संख्येचा बनाव आणि भ्रष्टाचाराचे आरोप
संघटनेने विविध शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कृत्रिमरित्या वाढवून दाखवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
- प्रतिभाताई पवार हायस्कूल, जवळा निजाम (ता. परंडा) येथे विद्यार्थी संख्या २५ असतानाही शाळा सुरू आहे.
- समता विद्यालय, सापनाई येथे पटसंख्या केवळ ६० असूनही, विद्यार्थ्यांची बनावट नोंद करून १०० हून अधिक दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.
- संत रामचंद्र पाटील विद्यालय, किणी (ता. धाराशिव) येथे कमी विद्यार्थ्यांमुळे मुख्याध्यापक पद कमी झालेले असतानाही शाळा सुरू आहे.
- हरीभाऊ घोगरे हायस्कूल, उपळे ( मा )येथेही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या बनावट प्रवेशासंबंधी आरोप करण्यात आले आहेत.
शिक्षणाधिकाऱ्यांवर खंडणी वसुलीचे आरोप
संघटनेच्या म्हणण्यानुसार, शिक्षणाधिकारी महोदया मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करून मुख्याध्यापक व प्रभारी पदांवर नियुक्त्या करीत आहेत. शालेय पोषण आहार योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिक्षकांच्या अनुपस्थितीवर देखील गंभीर आरोप
संस्थाचालकांच्या नातेवाईकांची शाळांमध्ये नियुक्ती करून त्यांना शाळेत न येता वेतन मिळत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, भाई उद्धवराव कन्या प्रशाला, काकडे प्लॉट, धाराशिव येथे कार्यरत असलेल्या श्रीमती प्रिया गाढवे दोन वर्षे शाळेत अनुपस्थित राहूनही त्यांना वेतन मिळत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात आहे.
अनधिकृत नोकरभरती आणि लाचखोरीचा आरोप
राज्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी असताना, धाराशिव जिल्ह्यातील हरीभाऊ घोगरे हायस्कूल, उपळे (मा ) येथे एका कर्मचाऱ्याची शिक्षणाधिकाऱ्यांनी १० लाख रुपयांची लाच घेऊन नियुक्ती केल्याची चर्चा असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. तसेच, शिक्षण हजेरी रजिस्टरमध्ये या कर्मचाऱ्याचे नाव नसतानाही त्याच्या हजेरीसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
शिक्षण विभागाच्या अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी
संघटनेने शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीची मागणी केली असून, ही चौकशी निःपक्षपाती अधिकाऱ्यांमार्फत किंवा गुप्तचर यंत्रणेमार्फत करण्याची मागणी केली आहे. तसेच, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, जेणेकरून अनेक धक्कादायक तथ्य उघडकीस येतील, असा दावाही संघटनेने केला आहे.
सरकारकडून ठोस कारवाईची मागणी
संघटनेच्या म्हणण्यानुसार, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या अनियमित कारभारामुळे जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. शासनाने याप्रकरणी तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.