धाराशिव जिल्ह्यात अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चार वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनांनी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे. या घटनांमुळे पोलिस प्रशासनाचीही चिंता वाढली असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनांमध्ये सोन्याचे दागिने, मोटरसायकली, आणि टायर्सचा समावेश असून, या चोरीच्या घटनांचा तपास वेगाने सुरू आहे.
पळसपमध्ये घरफोडी
ढोकी येथे दिलीप निवृत्ती सरडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या पळसप येथील घरी अज्ञात व्यक्तीने दि. 21 जुलै 2024 रोजी रात्री दोन रुमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 8000 रुपये रोख रक्कम असा एकूण 53,000 रुपये किंमतीचा माल चोरला. यावर ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
परंड्यात मोटरसायकल चोरी
परंडा येथे जित संजय कोळगे यांच्या हार्डवेअर दुकानासमोर उभी केलेली होंडा शाईन मोटरसायकल (क्र. एमएच 25 ए.पी 1270) अज्ञात व्यक्तीने दि. 9 जुलै 2024 रोजी रात्री 11.00 ते 10 जुलै 2024 रोजी सकाळी 7.00 वाजेच्या दरम्यान चोरून नेली. याबाबत परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे.
धाराशिवमध्ये मोटरसायकल चोरी
धाराशिव येथे लिंबराज सुरेश ढोणे यांच्या घरासमोर उभी केलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एमएच 13 डी.झेड 1623) अज्ञात व्यक्तीने दि. 12 जुलै 2024 रोजी रात्री 3.00 ते 6.00 वाजेच्या दरम्यान चोरून नेली. यावर धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वाशीत टायर चोरी
वाशी येथे महारुद्र रामकिसन नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ईट येथील लिमकर यांच्या पेट्रोल पंपासमोर उभी केलेल्या टाटा गाडीचे (क्र. एमएच 23 डब्ल्यु 2659) चार जुने टायर अज्ञात व्यक्तीने दि. 17 जुलै 2024 रोजी सकाळी 9.30 ते 18 जुलै 2024 रोजी सकाळी 5.00 वाजेच्या दरम्यान चोरून नेले. यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.