धाराशिव – लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. परंतु १ जून रोजीच सर्वच वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एग्जिट पोल जाहीर झाले आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतुत्वाखालील एनडीए सरकार पुन्हा एकदा हॅटट्रिक मारणार , असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
देशातील सर्वच वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी जो एग्जिट पोल जाहीर केला आहे, त्यात एनडीए ला किमान ३५० ते ३७५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला तिसऱ्या वेळीही पुन्हा सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे, हे दिसून येत आहे.
एकीकडे देशात एनडीएला बहुमत मिळत असताना, महाराष्ट्रात मात्र महायुतीला संघर्ष करावा लागत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडूनही आणि फुटीर गट भाजपला मिळूनही म्हणावा तसा फायदा भाजपला दिसत नाही, असेच चित्र एग्जिट पोल मध्ये दाखवण्यात आले आहे. महाराष्ट्रात महायुतीला २५ ते ३० जागा तर महाविकास आघाडीला १५ ते २० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धाराशिव मतदारसंघात ओमराजेना पसंती
या एग्जिट पोलमध्ये धाराशिवची जागा शिवसेना (उबाठा ) चे ओमराजे निंबाळकर जिंकणार असा अंदाज टीव्ही ९ मराठी आणि एबीपी माझाने व्यक्त केला आहे. तर पुढारी न्यूजने राष्ट्रवादी तथा महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील बाजी मारणार , असा अंदाज व्यक्त केला आहे.
सविस्तर बातमी वाचा …
लोकसभा निवडणूक : धाराशिवच्या निकालाची धाकधूक वाढली
धाराशिव लाइव्हचा अंदाज
लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात अटीतटीचा सामना झाला असल्याने कोण निवडून येईल, हे कुणीच सांगू शकत नाही. दोन्ही उमेदवारांना समसमान संधी आहे. ओमराजे आणि अर्चनाताई यापैकी कुणीही निवडून आला तरी २५ ते ३० हजार मताच्या फरकाने निवडून येईल, असा अंदाज आहे.