वाखरवाडी – धाराशिव जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात गंभीर पाणीटंचाई जाणवते. भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खालावत असून, अनेक भागांत बोअरवेल कोरड्या पडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे येथील उर्ध्वम संस्था आणि ज्ञानप्रबोधिनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व बायर कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून वाखरवाडी आणि दुधगाव येथे बोअरवेल पुनर्भरणाचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमांतर्गत बोरचार्जर या अत्याधुनिक पेटंटेड तंत्रज्ञानाच्या मदतीने बोअरवेल पुनर्भरण करण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे बोरवेलमधील पाणीपुरवठ्याचा कालावधी १ ते ३ महिन्यांनी वाढतो आणि भूजल पुनर्भरण ४ ते २० पट वाढते. परिणामी, २ लाख ते ८० लाख लिटर पाणी एका बोअरवेलमध्ये पुन्हा साठवले जाऊ शकते.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार
या तंत्रज्ञानाविषयी जागृती करण्यासाठी वाखरवाडी आणि दुधगाव येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे समन्वयक सचिन सूर्यावंशी यांनी उपस्थितांना या प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली.
उर्ध्वम संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रफुल पाटील यांनी बोअर चार्जर तंत्रज्ञान कसे कार्य करते, याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
तर भूवैज्ञानिक घनश्याम बागले यांनी भूजल पुनर्भरणाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सध्या धाराशिव तालुक्यात २५० बोअरवेलचे पुनर्भरण पूर्ण झाले आहे. दुधगावमध्ये ४२ आणि वाखरवाडीमध्ये १० बोअरवेल पुनर्भरण करण्यात आले आहेत.
ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद
कार्यक्रमाच्या शेवटी जलयोद्धे लहू शिंदे यांनी आभार मानले. दुधगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच मिरज पटेल, तसेच ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे जलदूत लहू शिंदे, महेश धाबेकर, अमर शेख, सुशांत पुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला. ग्रामपंचायतीकडून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन देण्यात आले असून, नागरिकांनी आपल्या बोअरवेल पुनर्भरणासाठी पुढे यावे, असे आवाहन सरपंचांनी केले.
बोअरवेल पुनर्भरणामुळे पाणीटंचाईला दिलासा
उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, या प्रकल्पाच्या माध्यमातून भूगर्भातील जलसाठा वाढवण्यास मदत होणार आहे. हे तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरल्यास भविष्यात पाणीटंचाईच्या समस्येवर मोठा दिलासा मिळू शकतो.