सध्याच्या डिजिटल युगात विमा फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बनावट विमा एजंट नागरिकांची फसवणूक करून त्यांचे आर्थिक नुकसान करत आहेत. त्यामुळे, योग्य काळजी घेतल्यास आणि सतर्क राहिल्यास अशा फसवणुकीला आपण बळी पडण्यापासून वाचू शकतो. भारतातील आघाडीच्या इन्शुरटेक ब्रॅंड इन्शुरन्सदेखो यांनी नागरिकांना जागरूक करण्यासाठी पाच मुख्य इशारे दिले आहेत.
तोतया विमा एजंट ओळखण्याचे पाच महत्त्वाचे संकेत:
१. अवास्तव आकर्षक ऑफर: जर कोणताही विमा प्लॅन अत्यंत कमी प्रीमियममध्ये मोठा परतावा देण्याची हमी देत असेल, तर ती फसवणूक असण्याची शक्यता जास्त आहे. अस्सल विमा पॉलिसीमध्ये ठराविक जोखमी आणि नियम असतात. त्यामुळे कोणतीही योजना खूपच चांगली वाटत असेल, तर ती आधी नीट तपासून घ्या.
२. फक्त रोख पेमेंटची मागणी: कोणतीही अधिकृत विमा कंपनी थेट रोख रकमेची मागणी करत नाही. तसेच, खाजगी बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले जाते, तर ती मोठी धोक्याची घंटा आहे. विम्याचे सर्व पेमेंट अधिकृत कंपनीच्या खात्यात जमा होते याची खात्री करावी.
३. डिजिटल किंवा अधिकृत उपस्थिती नसणे: सध्याच्या काळात प्रत्येक अधिकृत विमा एजंटची ओळख ऑनलाईन पाहता येते. जर एखाद्या एजंटचे लिंक्डइन प्रोफाइल, अधिकृत वेबसाइटवरील नोंदणी किंवा विमा नियामक संस्थेकडून नोंदणी नसल्यास तो संशयास्पद असतो. त्यामुळे विमा खरेदी करण्याआधी एजंटची ओळखपत्रे पडताळून पाहणे आवश्यक आहे.
४. अव्यावसायिक कम्युनिकेशन: अधिकृत विमा एजंट नेहमी कंपनीच्या ईमेल आयडीद्वारे संवाद साधतात. जर एखादा एजंट Gmail, Yahoo किंवा इतर कोणत्याही अनधिकृत ईमेल आयडीचा वापर करत असेल तर सावध राहा. तसेच, WhatsApp किंवा सोशल मीडियावरूनच विमा विक्रीचा आग्रह धरणारे एजंट फसवणुकीचे असू शकतात.
५. त्वरित निर्णय घेण्यासाठी दबाव: घोटाळेबाज एजंट लोकांना घाई घाईने निर्णय घेण्यास भाग पाडतात. “ही ऑफर आजच संपणार आहे!”, “तात्काळ पेमेंट केल्यास मोठा फायदा मिळेल!” अशा प्रकारच्या युक्त्या वापरून ते लोकांची फसवणूक करतात. खरे एजंट ग्राहकांना विचार करण्यासाठी वेळ देतात आणि कोणतेही निर्णय घेण्यास जबरदस्ती करत नाहीत.
स्वतःला फसवणुकीपासून कसे वाचवाल?
- विमा नियामक संस्थेकडून एजंटच्या परवान्याची पडताळणी करा.
- विमा कंपनीशी थेट संपर्क साधून एजंटची ओळख पुष्टी करा.
- रोख पेमेंट टाळा आणि केवळ अधिकृत चॅनल्सद्वारेच पेमेंट करा.
- एजंटची पार्श्वभूमी ऑनलाइन रिव्ह्यू आणि सरकारी लिस्टिंगद्वारे तपासा.
- काही संशयास्पद वाटल्यास त्वरित चौकशी करा आणि निर्णय घेण्यास घाई करू नका.
नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज
विमा हे आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे साधन आहे, परंतु योग्य काळजी न घेतल्यास फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता असते. म्हणूनच, कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करण्याआधी पूर्णपणे खात्री करूनच पुढे जाणे आवश्यक आहे. आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.