धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाईचे सरपंच नामदेव निकम यांनी स्वतःवर हल्ला झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलीस तपासात हा हल्ला बनावटीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. बंदुकीचे लायसन्स मिळवण्यासाठी निकम यांनी स्वतःवर हल्ला झाल्याचे नाटक रचल्याचे उघड झाले आहे.
नेमके काय घडले होते?
निकम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 26 डिसेंबर रोजी रात्री व्होनाळा ते जवळगा मेसाई रोडने त्यांची कार (क्र. MH 12 QT 7790) मधून जात असताना दोन नेमप्लेट झाकलेल्या मोटारसायकलवरील तोंड झाकलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आणि त्यांच्या अंगावर पेट्रोल भरलेला फुगा फेकण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र प्रविण इंगळे देखील होता.
पोलिसांनी उलगडला बनाव
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, निकम यांनी सांगितलेल्या घटनेत आणि घटनास्थळावरील परिस्थितीत विसंगती आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून निकम आणि इंगळे यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बनाव केल्याची कबुली दिली.
निकम यांना बंदुकीचे लायसन्स मिळावे यासाठी त्यांनी स्वतःवर हल्ला झाल्याचे नाटक रचले होते. त्यांनी स्वतःच आपल्या गाडीच्या काचा फोडल्या आणि स्वतःवर पेट्रोल टाकून हल्ला झाल्याचा बनाव केला.
विरोधकांची टीका फोल ठरली
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात वातावरण तापले होते. त्यातच निकम यांच्यावरील हल्ल्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मात्र, आता हा हल्ला बनावटीचा असल्याचे सिद्ध झाल्याने विरोधक तोंडावर पडले आहेत.
पोलिसांचे कौतुकास्पद काम
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, स्थानिक गुन्हे शाखेची टीम, सपोनि भालेराव, सपोनि चासकर यांनी केला.या प्रकरणी पोलिसांनी निकम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.