तुळजापूर: “छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या पायऱ्या आणि देवीच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही, मंदिराचा एक दगडही हलू देणार नाही,” असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिल्यानंतर आज तुळजापुरात मोठे नाट्यमय घडामोडी घडल्या. आव्हाडांच्या मंदिर पाहणी दौऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करत त्यांची गाडी अडवून ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत गेले.
काय आहे नेमके प्रकरण?
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून गाभारा दुरुस्ती आणि इतर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या कामाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला होता. “इतर विकास कामांना माझा विरोध नाही, पण गरज नसताना देवीच्या गाभाऱ्याची मोडतोड का केली जात आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आपण सनातनी हिंदू नसलो तरी हिंदू असून देवीच्या मंदिराच्या दगडाला हात लावू देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी या कामांची पाहणी करण्यासाठी तुळजापूरला येणार असल्याचे जाहीर केले होते.
दौऱ्यावेळी मोठा गोंधळ आणि हाणामारी
आज जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मंदिरात येऊन दर्शन घेतले आणि विकास कामांची पाहणी केली. मात्र, आव्हाड मंदिरात असतानाच, बाहेर जमलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी आव्हाडांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ आव्हाडांची गाडी अडकून पडली आणि मोठा गोंधळ निर्माण झाला.
या गोंधळात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले, ज्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि हाणामारीचा प्रसंग उद्भवला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी केली. त्यांनी जमावाला बाजुला करत आव्हाडांच्या गाडीला वाट मोकळी करून दिली, त्यानंतर तणाव निवळला.
आव्हाड निघून गेल्यानंतर, भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरासमोर देवीची आरती केली आणि जितेंद्र आव्हाड यांना ‘सद्बुद्धी’ मिळावी यासाठी देवीचरणी प्रार्थना करत घोषणाबाजी केली. या घटनेमुळे तुळजापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.