तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे शुक्रवारी रात्री गोमांस पकडल्याने दोन गटांत तणाव निर्माण झाला. रिक्षातून गोमांस जात असल्याची माहिती मिळताच काही तरुणांनी रिक्षाला थांबवून तपासणी केली. गोमांस आढळल्याने त्यांनी रिक्षा थेट तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये आणला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप आरोपीला अटक झालेली नाही.
गुन्हा दाखल होताच रिक्षाचालकाच्या समर्थकांनी काही तरुणांवर हल्ला करून मारहाण केली. प्रतिकार म्हणून गोमांस पकडणाऱ्यानी तुळजापूरचे काही तरुण आणून त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे.
एकमेकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने आज शनिवारी पोलीस स्टेशनवर धडक देत ठिय्या आंदोलन सुरु केले. सुमारे ५० ते ६० जणांचा जमाव पोलिस ठाण्यात जमला असून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे.
पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. पोलिस प्रशासनाकडून शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी अधिकाऱ्यांनी धाव घेतली असून जमावाला शांत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
70 वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशाजी इब्राहिम कुरेशी (वय 70 वर्षे, रा. रसुलपुरा, धाराशिव) हे तुळजापूर शहरातील कांक्रबा ते धारुर जाणाऱ्या रस्त्यावर एका ॲटो रिक्षामध्ये गोवंशीय जनावरांचे मांस वाहतूक करताना आढळले. पोलीसांनी तपासणी केली असता, रिक्षामध्ये पशुवैद्यकीय विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी नसलेल्या गोमांसाचा साठा मिळाला. जप्त करण्यात आलेले गोवंशीय मांस सुमारे 9,900 रुपयांचे असल्याचे आढळले. तुळजापूर पोलीसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारित अधिनियम 1995 चे कलम 5 (क) आणि 9 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
.