धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला सोलर पंप योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे ती योजना केवळ कागदावरच असल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात तब्बल 17 हजार शेतकऱ्यांनी सोलार पंपासाठी पैसे भरले आहेत, मात्र सहा महिन्यांनंतरही त्यांना सोलार पंप मिळालेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
कंपनी निवड व स्पॉट सर्वे रखडले
सोलर पंप योजनेअंतर्गत सोलर पंप बसविण्यासाठी संबंधित कंपन्यांची निवड आणि स्पॉट सर्वे प्रक्रिया रखडल्याने शेतकऱ्यांना पंप मिळण्यास विलंब होत आहे. योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज केलेले 61 हजार शेतकरी देखील अद्याप प्रतीक्षेत आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि कुसुम योजनेलाही ब्रेक
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि कुसुम योजनेअंतर्गत अर्जदार असलेल्या शेतकऱ्यांचेही हालच आहेत. या शेतकऱ्यांना सोलर पंप मिळण्याची प्रतीक्षा असून, या योजनांचे लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत आहेत.
शेतकऱ्यांची मागणी – सरकारने लक्ष द्यावे
शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, या योजनेतील त्रुटी दूर करून त्वरित सोलर पंप उपलब्ध करून द्यावेत. सोलार पंप मिळाल्यास पाणीपुरवठा सोपा होईल आणि शेतीला मदत मिळेल. त्यामुळे सरकारने योजनेची अंमलबजावणी गतीने करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.