कळंब – कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका ८० वर्षीय वृद्धाला चौघांनी मिळून शिवीगाळ करत कुऱ्हाडीच्या दांड्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित वृद्धाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी नबी फरीद तांबोळी (वय ८०, रा. शेळका धानोरा) यांचे गावातीलच काही जणांसोबत पूर्वीचे भांडण होते. याच वादाचा राग मनात धरून, आरोपी समीर सिकंदर तांबोळी, सिकंदर फरीद तांबोळी, दिलशाद शमीर तांबोळी आणि शाम निजाम तांबोळी (सर्व रा. शेळका धानोरा) यांनी शुक्रवारी, दि. १ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नबी तांबोळी यांना गाठले.
आरोपींनी प्रथम वृद्धाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर लाथाबुक्क्यांनी व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले. इतकेच नाही, तर ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकीही दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या हल्ल्यानंतर नबी तांबोळी यांनी तात्काळ कळंब पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार मारहाण, शिवीगाळ, आणि जीवे मारण्याची धमकी देणे या कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.