कळंब – तालुक्यातील घारगाव येथे मंदिरातील भजनात अडथळा आणणाऱ्या एका व्यक्तीला थांबवल्याचा राग मनात धरून, ११ जणांच्या जमावाने एका कुटुंबाच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. तसेच घरातील साहित्याची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घारगाव येथील रहिवासी श्रीमंत हरिशचंद्र साळुंके (वय ५७) यांनी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गावातील मंदिरात भजन सुरू होते. यावेळी आरोपी शंकर गंगाधर साळुंके हा भजनात अडथळा आणत असल्याने, फिर्यादी श्रीमंत साळुंके यांनी त्याला बाहेर थांबण्यास सांगितले.
याचा राग आल्याने शंकर साळुंके याने इतर १० साथीदारांना जमवले. अशोक कल्याणराव साळुंके, युवराज शंकर साळुंके, नानासाहेब गंगाधर साळुंके, शंकर गंगाधर साळुंके, उमेश शंकर साळुंके, अनिकेत अशोक साळुंके, गणेश नानासाहेब साळुंके, विजय बाळासाहेब साळुंके, संदीप राम थोरात, शुभम धर्मराज साळुंके, धर्मराज गंगाधर साळुंके (सर्व रा. घारगाव) यांनी मिळून श्रीमंत साळुंके यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून घरात जबरदस्तीने प्रवेश केला.
आरोपींनी घरात घुसून श्रीमंत साळुंके, त्यांची पत्नी भागीरथी साळुंके व मुलगा श्रीकर साळुंके यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच, घरातील संसारोपयोगी साहित्याची तोडफोड करून नुकसान केले आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.
श्रीमंत साळुंके यांनी ११ एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून, शिराढोण पोलिसांनी वरील ११ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३३३ (मालमत्तेचे नुकसान), ३५२, ३५१(२), १८९(२) (घरात घुसखोरी), १९१(२), १९१(३), १९० (धमकी/गैरकायदेशीर जमाव), ३२४(४) (मारहाण) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.