येरमाळा: दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाने ४५ वर्षीय व्यक्तीचा गमजाने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथे घडली आहे. आरोपीने पीडित व्यक्तीला दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले व त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
याप्रकरणी बाळासाहेब नरसिंग गाढवे (वय ४५, रा. वडगाव ज.) यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सोन्या उर्फ निखील शिवाजी शिंदे (रा. वडगाव ज.) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ ऑगस्टच्या रात्री पावणेनऊ ते २६ ऑगस्टच्या सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान वडगाव (ज.) येथील तुकाराम जगताप यांच्या किराणा दुकानासमोर घडली. बाळासाहेब गाढवे यांना आरोपी सोन्या शिंदे याने अडवले आणि “दारू पिण्यासाठी पैसे दे, नाहीतर तुला ठार मारतो,” अशी धमकी दिली. गाढवे यांनी पैसे देण्यास नकार देताच, आरोपीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्याला गमजा (टॉवेल) आवळला. त्यानंतर शिवीगाळ करत त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये काढून घेतले आणि पुन्हा जीवे मारण्याची धमकी देऊन पसार झाला.
बाळासाहेब गाढवे यांनी २६ ऑगस्ट रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सोन्या शिंदे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), ११९(१), ११५(२), १२६(२), १२५(ए) (जबरी चोरी), ३५२, ३५१(२),(३) (गंभीर दुखापत) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. येरमाळा पोलीस आरोपीचा शोध घेत असून, प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.