कळंब – कळंब शहरात ‘सिमेंटच्या प्लेटवरून बाजूला उभे राहा’ असे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून दारूच्या नशेत असलेल्या तिघांनी एका ५० वर्षीय व्यक्तीला लोखंडी रॉड व कड्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी, ५ मे रोजी सायंकाळी घडली असून, त्याच दिवशी पीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी मुजफर अल्ली सादीक अल्ली सय्यद (वय ५० वर्षे, रा. इंदीरानगर, कळंब) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुरज उर्फ बापु श्रीकृष्ण उर्फ किसन जावळे, सागर पारेकर आणि अजय शंकर कदम (सर्व रा. कसबा पेठ, कळंब) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मे २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास कळंब शहरातील ढोकी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ, मयुर रुण्वाल यांच्या नवीन बिल्डिंगसमोर ही घटना घडली. फिर्यादी मुजफर सय्यद हे तेथे बांधकाम साहित्य व्यवस्थित ठेवत असताना, आरोपी सुरज जावळे हा दारू पिऊन तेथे आला आणि स्लॅबसाठी आणलेल्या सिमेंटच्या प्लेटवर उभा राहिला. सय्यद यांनी त्याला “या प्लेट नालीवर ठेवायच्या आहेत, त्यामुळे तू बाजूला उभा राहा,” असे समजावून सांगितले.
याचा राग आल्याने सुरज जावळे आणि त्याचे साथीदार सागर पारेकर व अजय कदम यांनी सय्यद यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिन्ही आरोपींनी मुजफर सय्यद यांना लाथाबुक्यांनी, तसेच लोखंडी रॉड (पार) आणि कड्याने मारहाण केली. या मारहाणीत सय्यद गंभीर जखमी झाले. आरोपींनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेनंतर सय्यद यांनी तात्काळ कळंब पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(२) (दंगा करणे/सार्वजनिक शांतता भंग), ३५२ (गंभीर दुखापत करणे), ३५१(२) (धमकी देणे) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. कळंब पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.