कळंब : एका अल्पवयीन मुलीला २०१७ पासून सलग सात वर्षे आय-पिलच्या गोळ्या खायला घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गुन्ह्यात तरुणाला मदत करणाऱ्या आणि पीडितेला “वाढदिवसाला एका रात्रीसाठी गिफ्ट देते,” असे म्हणणाऱ्या एका महिलेसह दोघांवर कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित २४ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१७ साली ती अल्पवयीन असल्यापासून ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत गावातीलच एका तरुणाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपी तरुणाने तिला आय-पिलच्या (गर्भनिरोधक) गोळ्या खाऊ घालून हे कृत्य केले.
या गुन्ह्यात गावातीलच एका महिलेने आरोपी तरुणाला मदत करत गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहन दिले. “तुला वाढदिवसाला एका रात्रीसाठी गिफ्ट देते,” असे ती आरोपी तरुणाला म्हणाली आणि तिने पीडितेचे काहीही ऐकून घेतले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने अखेर १६ जून २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुण आणि त्याला मदत करणाऱ्या महिलेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एफ)(आय)(एम), ६९, ५५ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६, आणि १६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (पीडितेचे नाव आणि गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे).